आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52 एकर जागांवर बड्या बिल्डरांचा डोळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जागा संपादनाविषयी महापालिकेची अनास्था आणि भूसंपादन कार्यालयाकडून अधिसूचनेस विलंबाचा गैरफायदा घेत शहरातील चार बांधकाम व्यावसायिकांनी पालिकेच्या आरक्षित जागांवरच डल्ला मारण्याचा डाव रचला आहे. मूळ जागामालकाला हाताशी धरून या जागा हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याने पालिकेची जवळपास 52 एकर जागा हातातून जाण्याची भीती आहे.
आरक्षित जागा वर्षानुवर्षे संपादित केल्या जात नसल्याने अनेक जागा यापूर्वीच हातून निसटल्या आहेत. 26 पैकी तीन प्रकरणांचा निकाल पालिकेविरोधात गेला आहे. उर्वरित 23 प्रकरणांमध्येही निकाल विरोधात गेल्यास कोट्यवधींच्या जागांवर पालिकेला पाणी सोडावे लागणार आहे. दहा वर्षांत संपादन प्रक्रिया पूर्ण न केल्याने 23 प्रकरणांमधील मूळ जागामालकांनी कलम 127 नुसार नोटीस देत न्यायालयात धाव घेतली आहे. आरक्षित जागेच्या मोबदल्यात देण्यासाठी निधीच नसल्याने संपादनास विलंब होत असून, भूसंपादन विभागही अधिसूचना, जागामोजणीस विलंब करीत असल्याने बांधकाम व्यावसायिकांचे फावले आहे. जागामालकाशी हातमिळवणी करीत मुखत्यारपत्र तयार करायचे आणि निकाल मालकाच्या बाजूने लागल्यावर जमीन चालू बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीत हडप केली जात आहे.
या कारणांसाठी आरक्षणे - विहितगाव- दवाखाना, प्रसूतिगृह, ग्रंथालय सभागृह, 12 मीटर डीपीरोड. नाशिक शिवार- प्राथमिक शाळा, क्रीडांगण, स्टेडियम, डीपीरोड. आडगाव- शैक्षणिक संकुल. कामटवाडे- उद्यान. देवळाली- उद्यान, मखमलाबाद- कचरा डेपो. अन्य आरक्षित जागा- मार्केट, शॉपिंग सेंटर, पार्किंग, पोलिस चौकी.
तर सर्वोच्च न्यायालयात - तीन आरक्षित जागांविषयी उच्च् न्यायालयात महापालिकेविरोधात निकाल लागलेला असला तरी त्याबाबत सर्वोच्च् न्यायालयात दावा दाखल करू प्रयोजनासाठीच या जागांचा उपयोग होईल. संजय खंदारे, आयुक्त, महापालिका
ही आहेत प्रकरणे - विहितगाव येथील स. नं. 79/6/1, 79/7/3, 79/6/2/2, 79/7/2, 79/7/1, 79/6/2/1, मौजे नाशिक शिवारातील स. नं. 648ब पैकी अंतिम भूखंड क्र. 311अ, 311 पै, आडगाव स.नं. 1075 आ.क्र. 111, कामठवाडे येथील स.नं. 29 पै, 44पै, 45पै आ.क्र. 31, देवळाली शिवारातील स.नं. 47 पैकी आ.क्र. 177, नाशिक शिवारातील स.नं. 264/4,5,6 मधील आ.क्र. 271, देवळाली शिवारातील स.नं. 26/3/2 पै आ.क्र. 176, मखमलाबाद स.नं. 325/3 आ.क्र. 92, नाशिक शिवारातील स.नं. 197/1अ/3 आ. क्र. 294, देवळाली स.नं. 113 पै. आ.क्र. 201, स. नं. 42/1/2 आ. क्र. 200, स.नं. 42 पैकी आ.क्र. 197, स.नं. 19पै, 24 पै. आ.क्र. 173, नाशिक शिवारातील स.नं. 22 आ.क्र. 389, विहितगाव स.नं. 79 पैकी आ.क्र. 243.