आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीसाठा वाढण्यासाठी बिल्डर्सचे ‘सोशल कन्स्ट्रक्ट’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी दूरदृष्टी ठेवत आगामी काळात पुन्हा पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागू नये, यासाठी धरणातील गाळ काढण्याचा उपक्रम राबवला. तसेच प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यातही पुढाकार घेतला आहे.

यंदाच्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहरी भागांतील नागरिकांनाही ग्रामीण भागातील जनतेच्या वेदना समजल्या. त्यामुळे या दिशेने काहीतरी ठोस काम करायचे, असा निश्चय नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांनी केला. त्याला मूर्त स्वरूप देत क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष किरण चव्हाण, बांधकाम व्यावसायिक सागर बोंडे आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया नाशिकचे अध्यक्ष विलास बिरारी यांनी एकत्र येत पाणीप्रश्नावर काम सुरू केले. त्यासाठी त्यांनी अनेक भागात अभ्यास दौरे केले. संबंधित परिसरातील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती घेतली.

शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांना नाशिकमध्ये आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन मिळवून दिले. त्यानंतर गंगापूर धरणातील गाळ काढणे, वाहेगाव येथील नाला खोदून बंधारा ऊजिर्तावस्थेत आणणे आणि प्राण्यांना पाणी पुरवण्याचे काम करण्यात आले. यामुळे भविष्यासाठीही पाणी साठविण्याची मोठी तरतूद झाली आहे.

कोट्यवधीचे काम लाखात
आपापल्या संघटनांच्या सदस्यांना सोबत घेत या तिघांनी गंगापूर धरणातील गाळ काढण्याच्या कामापासून सुरुवात केली. या गाळामुळे जलसंचय क्षमता कमी झाली होती. या कामासाठी भुजबळ फाउंडेशनचेही सहकार्य मिळाले. क्रेडाईने निधी उभारला तर विलास बिरारी यांनी पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले. त्यानंतर गाळ उपसण्याच्या कामाला वेग आला. यानंतर निफाड तालुक्यातील वाहेगाव येथील दोन किलोमीटरचा नाला खोदून बंधारा उर्जितावस्थेत आणण्याचे कामही पूर्ण करण्यात आले. या कामांसाठी शासकीय यंत्रणेला कोट्यवधी रुपयांचा खर्च आला असता. पण, या त्रयीने ते काम काही लाखांत करून दाखविले, तेही शासनाचा छदामही न घेता.