आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Builders Association Of The National Council News In Marathi

बिल्डर्स असोसिएशनची राष्ट्रीय परिषद उद्यापासून , नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद 25 आणि 26 जुलै रोजी नाशकात होणार आहे. हॉटेल एक्स्प्रेस इन येथे होणार्‍या या परिषदेत देशभरातून हजारावर सदस्य व पदाधिकारी सहभागी होणार असून, परिषदेचे उद्घाटन 25 जुलै रोजी दुपारी 4 वाजता केंद्रीय भूपृष्ठ तथा परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. 26 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील, नाशिक सेंटरचे अध्यक्ष विलास बिरारी, सचिव गोपाळ अटल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यापूर्वी 2008 मध्ये अशाप्रकारे राष्ट्रीय परिषद नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती, हे स्पष्ट करतानाच या प्रकारच्या परिषदा वर्षातून चार वेळेस देशभरात आयोजित केल्या जातात. नाशिकमध्ये आयोजित केलेल्या या परिषदेत ‘भारतीय बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रासमोरील आव्हाने आणि संधी’ या विषयावर चर्चासत्र होणार असून, गडकरीदेखील याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशांतकुमार बासू, सचिव महेश मुड्डा, उपाध्यक्ष लालचंद वर्मा, बी. सिनया, एल. मूर्ती, नरेश सिंग यांची प्रमुख उपस्थिती राहील, असे बिरारी यांनी स्पष्ट केले. या वेळी, अविनाश आव्हाड, अभय चोकशी, महेश भामरे आदी उपस्थित होते.

सिंगल विंडो व करसुसूत्रतेची मागणी करणार : विविध परवानग्या एकाच ठिकाणाहून मिळाव्यात, त्यासाठी वेळेचे बंधन निश्चित करण्यात यावे आणि बांधकाम क्षेत्रावर आकारण्यात येणार्‍या विविध करांत सुसूत्रता यावी, याकरिता या परिषदेत नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याचे विलास बिरारी यांनी सांगितले.
या विषयांवर होणार चर्चा
सिमेंटची कृत्रिम दरवाढ आणि त्याचा बांधकाम उद्योगावर व परिणामी ग्राहकांवर पडणारा आर्थिक बोजा यामुळे बांधकाम उद्योग संकटात येईल, असे वातावरण निर्माण झाले आहे. कंपन्यांनी केलेल्या या संघटित कृत्रिम दरवाढीच्या संदर्भाने या परिषदेत चर्चा होणार आहे. बांधकाम उद्योगासमोरील आव्हाने आणि संधी काय आहेत, नवीन सरकारचा काय फोकस आहे, त्यादृष्टीने कुठली आव्हाने आणि संधी आहेत, याबाबतचा ऊहापोह या परिषदेत होणार आहे.