आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगरात चार दुचाकी जाळल्या, नागरिक भयभीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - इंदिरानगर येथील कलानगरमधील संस्कृती अपार्टमेंटमधील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी जाळून दहशत पसरविण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केल्याची घटना साेमवारी पहाटे घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले असून, या ठिकाणी पोलिस आयुक्तांनी पाहणी करून माहिती घेत कारवाईचे आदेश दिले.
संस्कृती अपार्टमेंटमधील आदिती मोराणकर त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वप्रथम हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या ठिकाणी एका दुचाकीतून पेट्रोल काढून कपड्याने भिजवून इतर वाहने पेटविण्यात अाल्याचे निदर्शनास आले. याच इमारतीतील रहिवासी योगेश देवपूरकर त्यांचे नातलग अनुप दुसाने हे बाहेरगावाहून मध्यरात्री आले. त्यावेळी मात्र हा प्रकार घडला नव्हता. पहाटे हे कृत्य करून अज्ञात समाजकंटक पळून गेले. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली जात अाहे. याबाबत इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
सिडकोतील दहशतीचा अनुभव : चार-पाचवर्षांपूर्वी पवननगरातील निखिल पार्क भागात टिप्पर गँगच्या गुंडांनी दहशत माजवत ४० दुचाकी पेटवून दिल्या होत्या. त्यानंतर अनेकदा वाहन जाळपोळीच्या घटना घडल्या. या घटनेनंतर असे प्रकार अधून-मधून सुरूच आहेत. केवळ आपापसातील वैमनस्य दहशत निर्माण करण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत.
तपास करत आहोत
हा प्रकार नेमका काय, कुणी केला, याचा तपास करत आहोत. दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. कुणाला माहिती असेल तर पोलिसांना कळवावी. हेमंत सावंत, वरिष्ठ निरीक्षक, इंदिरानगर पोलिस ठाणे

गस्त वाढवावी...
नागरिकांनी सुरक्षारक्षक नेमला तरी तो सर्व जबाबदारी पाळू शकत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही बसवावेत. त्यामुळे सुरक्षितता मिळेल. पोलिसांनी गस्त वाढवावी. माणिक मेमाणे, अध्यक्ष, जय मल्हार मित्रमंडळ

जाहीर निषेध करतो
इंदिरानगरातील हा भाग शांत म्हणून ओळखला जातो. मात्र, अज्ञात व्यक्तींनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा निषेध करतो. आम्ही नागरिकांच्या पाठीशी आहोत. -आकाश खोडे, अध्यक्ष, संघर्ष

आमच्या भागात पोलिस गस्त नसते. त्यामुळे असे प्रकार घडतात. या ठिकाणी पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी. वाहने जाळणारे तत्काळ पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आदिती मोराणकर, रहिवासी, संस्कृती अपार्टमेंट
योग्यती कारवाई करावी...
वाहने जाळण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. यामुळे परिसरातील शांततेला बाधा निर्माण झाली आहे. पोलिसांना आमचे संपूर्ण सहकार्य आहेच. या प्रकाराला जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. सतीश सोनवणे, नगरसेवक

पोलिस आयुक्तांची पाहणी
याठिकाणी दुचाकी जाळपोळीची घटना घडताच पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक आयुक्त अतुल झेंडे, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत सावंत यांनी नगरसेवक सतीश सोनवणे नागरिकांशी चर्चा केली. या प्रकरणी दाेषींवर कारवाई करण्याचे आश्वासन पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांनी िदले.

या दुचाकी जाळल्या
एमएच१५ ईसी ७१५७, एमएच १५ सीएल ३९४८, एमएच १५ डीजे ६६७७, एमएच १५ बीबी ९५७८ या क्रमांकांच्या चार दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या, तर एमएच १५ सीडब्ल्यू ३१९४ एमएच १५ एटी २६७२ या दुचाकी वाचवण्यात रहिवाशांना यश अाले. यात एक सायकलही जाळण्यात अाली अाहे.