आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताने खचून न जाता पुन्हा घेणार भरारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘अपघाताने खचून न जाता अभियंता होण्याचे आई-वडिलांचे स्वप्न साकार करेनच,’ असा आत्मविश्वास उन्नती चौधरीने व्यक्त केला. रविवारी रात्री झालेल्या अपघातात बसच्या चाकाखाली तिच्या पायाचे पंजे चिरडले गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. नेहते हॉस्पिटलमध्ये रात्री डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत उन्नतीच्या पायांवर शस्त्रक्रिया केल्या. उन्नतीशी संवाद साधला असता तिने प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगासह दैनंदिन शहर बससेवेचा कसा अनुभव विद्यार्थ्यांना येतोय, याचे मांडलेले भयानक वास्तव तिच्याच शब्दात..

मी, मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षाला प्रवेश घेतला. महाविद्यालय सुरू होऊन दोन-तीन दिवस झाले. रविवारी गणवेश खरेदीकरिता आईसोबत आले होते. दुकान बंद असल्याने लगेचच घरी जाण्यासाठी आम्ही सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास न्यायालयासमोरील बसस्थानकावर बसची वाट पाहत उभे होतो. तेथे बस न थांबल्यानेच मीच आईला म्हटले, ‘मेळा स्थानकावरून बस मिळेल, तिथे जाऊ’ आणि आम्ही तेथे गेलो. त्यानंतर 8.30 वाजेला ओझरमिग बस आली. नेहमीप्रमाणे अतिवेगाने बसचालकाने यू टर्न घेतला व काही कळण्यापूर्वी बसचे पुढचे चाक माझ्या पायाच्या पंजावरून गेले. अपघातानंतर एका खासगी बसमधून मला जिल्हा रुग्णालयात नेले गेले. त्यानंतर मला काहीच आठवत नाही, असे उन्नतीने सांगितले. दरम्यान, ओझरला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बसचाच पर्याय असतो. आम्ही दररोज पाहतो, अनेक थांब्यांवर बसच थांबत नाहीत. बसमध्ये जागा असतानाही केवळ विद्यार्थी असतात म्हणून बस वेगाने थांब्यांपासून जातात. रविवारीही हेच घडले. अगदी मेळा स्थानकापासून पहिल्याच थांब्यावरही बस थांबली नाही म्हणून आम्हाला मेळा स्थानकावर जावे लागले.

असा प्रसंग कोणावरही नको : शिक्षणाकरिता मी नाशिकला बदली करून घेतल्याचे उन्नतीचे वडील प्रमोद चौधरी यांनी सांगितले. उन्नती व तिचा भाऊ मातोश्री अभियांत्रिकीत शिकतात. अशी दुर्घटना कुणाच्याही वाट्याला येऊ नये.