आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - शहर वाहतूक बसच्या चाकाखाली तरुणीच्या पायाचे पंजे चिरडले गेल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. सायंकाळी गर्दीच्या वेळी बसची संख्या वाढवावी, अशी वारंवार प्रवाशांनी केलेल्या मागणीची दखल न घेतल्याने हा गंभीर प्रकार घडल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी बसच्या काचा फोडल्या. यामुळे स्थानक परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, श्रावणी सोमवारनिमित्ताने त्र्यंबकेश्वर फेरीसाठी जाणार्या भाविकांची गर्दी असल्याने स्थानकात बंदोबस्तावरील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने स्थिती नियंत्रणात आली. या घटनेबाबतची माहिती अशी की, मातोश्री इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभियांत्रिकी पदविकेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेली उन्नती प्रमोद चौधरी (वय 21) आई सुषमा यांच्यासमवेत अमृतधामजवळील आपल्या घरी जाण्यासाठी मेळा बसस्थानकावर बसची वाट पाहत उभी होती. 8.30 वाजेच्या सुमारास बस (एमएच 14, बीसी 0295 ) वेगाने स्थानकात घुसली आणि चालकाने त्याच वेगाने ही बस वळविली. बस वळवित असतानाच उन्नतीच्या डाव्या पायाच्या पंजावरून बसचे चाक गेले. त्यानंतरही उन्नती बससोबत काही फुटांपर्यंत फरफटत गेली. त्यात तिच्या उजव्या पायाच्या पंजालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती उन्नतीचे काका अँड. देवीदास कोकाटे यांनी दिली.
बसवर दगडफेक
हा प्रकार घडल्यानंतर बसची वाट पाहणार्या काही तरुणांनी बसवर दगडफेक केली. सरकारवाड्याचे पोलिस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी संतप्त विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता, वारंवार मागणी करूनही बसची संख्या वाढविली जात नाही, त्यामुळे आठ आणि साडेआठच्या बसला प्रचंड गर्दी असते. यामुळे यापूर्वीही छोटे- छोटे अपघात घडल्याचे आणि आजचाही अपघात हे त्याचाच परिणाम असल्याची कैफियत मांडली. दरम्यान, उन्नतीला काही जणांनी जिल्हा रुग्णालयात व त्यानंतर नेहते हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
शहर बससेवाच कारणीभूत
सायंकाळी महाविद्यालय, शाळांतील विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक यांची घराकडे परतण्यासाठी गर्दी असते. त्यामुळे अक्षरश: बसमध्ये कोंबल्याप्रमाणे जावे लागते. बस आल्यानंतर त्यामध्ये चढण्यासाठीही त्यामुळे प्रवासी धावपळ करतात. ओझर मिगसारख्या लांब पल्ल्याकरिता वारंवार मागणी करूनही बसची संख्या वाढविली जात नाही. उन्नतीचा जो अपघात झाला त्याला केवळ बसचालकच नाही तर संपूर्ण बससेवाच कारणीभूत असून, संबंधितांवर कडक कारवाईची मागणी घटनास्थळी प्रवासी करीत होते.
प्रयत्नांची पराकाष्ठा करणार
उन्नतीच्या दोन्ही पायाच्या पंज्यांवरून गाडीचे चाक गेलेले असून, डाव्या पायाचा पंजा पूर्ण प्रभावित झाला आहे, तर त्याच्या तुलनेत उजवा काही अंशी ठीक आहे. तिच्यावर शक्य असलेले सर्व उपचार करण्यात येतील. डॉ. हर्षद आढाव, डॉ. नेहते हॉस्पिटल
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.