आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीवायके कॉलेजातही हाणामारी; कॉलेजच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक महोत्सवाची धूम सुरू असताना गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके महाविद्यालयात शुक्रवारी दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. सलग दुसर्‍या दिवशी महाविद्यालयांच्या प्रांगणात घडलेल्या अशा घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भोसला महाविद्यालयामध्ये गुरुवारी झालेल्या मारामारीच्या प्रकारामुळे सांस्कृतिक महोत्सवातील ‘मिसमॅच डे’ रद्द करण्यात आला होता. या घटनेपाठोपाठ शुक्रवारी बीवायके महाविद्यालयामध्ये दोन गटांत मारामारी झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
सध्या महाविद्यालयामध्ये अकरावीच्या परीक्षा सुरू आहेत. पेपर सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेस होणार्‍या गर्दीच्या वेळी ही घटना घडली. हा प्रकार घडण्यामागचे निश्चित कारण अद्याप समजले नसले तरीही मारामारीमध्ये काही विद्यार्थ्यांना इजा झाल्याचे समजले.
कॉलेजरोड परिसरातील महाविद्यालयांमध्ये वारंवार असे प्रकार घडत असतात. त्यामुळेच महाविद्यालयांनी काही महिन्यांपासून सुरक्षारक्षक नियुक्त केलेले आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश करताना व बाहेर पडताना आपल्याकडील ओळखपत्र दाखवणेदेखील बंधनकारक केलेले आहे. असे असतानाही अशा प्रकारची दुर्घटना घडत असल्याने महाविद्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.