आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागात लागणार केबल सेटटॉप बॉक्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महानगरांमध्ये सेटटॉप बॉक्स अनिवार्य केल्यानंतर आता नगरपालिका आणि ग्रामीण भागातही केबल डिजिटलायझेशनचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार डिसेंबर २०१५ पर्यंत पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील नागरी भागाव्यतिरिक्त शिल्लक असलेल्या भागात तसेच डिसेंबर २०१६ पर्यंत ग्रामीण भागात केबल डिजिटलायझेशन अनिवार्य केले जाणार आहे. ग्राहकांनाही त्यापूर्वीच सेटटॉप बॉक्स बसवावे लागणार आहेत.

केबल करामध्ये होणारी चोरी थांबविण्यासाठी शासनाने केबल डिजिटलायझेशनचा निर्णय घेतला. त्यात पहिल्या टप्प्यात देशातील चार महानगरांमध्ये त्यानंतर महत्त्वाच्या अर्थात अ-वर्ग महापालिकांमध्ये सेटटॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आला. आता तिसऱ्या टप्प्यात वर्ग महापालिका आणि चौथ्या टप्प्यात ग्रामीण भागाचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील क्षेत्रासाठी डिसेंबर २०१५ हीच अंतिम मुदत असून, यातच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील भागांचीही शिल्लक जोडणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात अर्थात ग्रामीण भागात डिसेंबर २०१६ पर्यंत सेटटॉप बॉक्स बसवावा लागणार आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात संपूर्ण जिल्हाच डिजिटलाइज होणार आहे. त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने विविध स्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. राज्यासाठी नोडल अर्थात समन्वय अधिकारी म्हणून प्रधान सचिव महसूल यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, जिल्हा स्तरावर अपर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसीलदारांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तेच आता केबल जोडण्या आणि सेटटॉप बॉक्सवर नियंत्रण ठेवणार आहेत. त्यामुळे आता शहरानंतर ग्रामीण मध्येही केबलचालक आणि एमएसओंकडून केला जाणारा करातील अपहार थांबणार असून, शंभर टक्के करवसुली होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.