आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्षेपण बंदच्या तयारीत प्रशासन; केबल चालकांकडून करमणूक कर येणे बाकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील जवळपास 163 केबलचालकांचे प्रतिज्ञापत्र आणि त्यातील 60 केबलचालकांनी थेट न्यायालयात कर भरल्याने उरलेल्या 103 केबलचालकांकडून करमणूक कर येणे बाकी आहे. तो त्वरित सादर न केल्यास आता कुठलीही गय केली जाणार नाही तसेच सूट दिली जाणार नाही तर थेट सिग्नलच बंद करण्याच्या तयारीत जिल्हा प्रशासन असल्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांनी सांगितले.

अस्तित्व नष्ट होण्याच्या भीतीने नाशिक शहरातील केबलचालकांनी प्रतिज्ञापत्र सादरीकरणास प्रथम विरोध केला. परंतु, प्रशासनाच्या कठोर भूमिकेपुढे नमत 172 केबलचालकांनी कालांतराने संयुक्त प्रतिज्ञापत्र सादर करत 93 लाख रुपये कराचा भरणाही केला होता. मात्र, 315 केबलचालकांपैकी निम्म्या केबलचालकांनी वारंवार सूचना देऊनही अद्याप कर भरलाच नाही. त्यामुळे प्रशासनाचीही गोची झाली आहे. सोमवारी एकूणच मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या तक्रारीवर सुनावणी होती. परंतु, त्यावर पुढील तारीख मिळाली. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार कर भरण्याची आस लावून बसलेल्या केबलचालकांना किती दिवस सूट द्यायची, त्यात शासनाचेच नुकसान होत असून, आता कुठल्याही परिस्थितीत कर वसूल होणे आवश्यक आहे. शिवाय, जिल्हाधिकार्‍यांनी स्वत:च केबलचालकांची बैठक घेत त्यांना कर भरण्याची सूचना 20 दिवसांपूर्वीच दिली होती. तरीही निम्मे केबलचालक त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच ही कठोर भूमिका घेण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले. प्रशासनाकडून अशी कारवाई झाल्यास केबल ग्राहकांची कुचंबणा होणार आहे.