आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणहक्क प्रवेश घोटाळाप्रकरणी ‘केंब्रिज’चे मुख्याध्यापक निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक केंब्रिज स्कूल या शाळेत शिक्षणहक्क याेजनेंतर्गत शाळेत नियमित प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचीच बोगस कागदपत्रे तयार करून प्रवेश दिल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी (दि. १९) शाळेच्या विश्वस्तांकडून प्रशासनाधिकाऱ्यांना यासंदर्भातील पत्र पाठवून माहिती देण्यात आली. ‘दिव्य मराठी’ने हा प्रकार उघडकीस आणल्याने या प्रकरणाची महापालिका प्रशासनाधिकाऱ्यांच्या चौकशी समितीमार्फत तब्बल ३५ दिवस करण्यात आलेल्या चौकशीत शाळा दोषी असल्याचे समोर आले होते. 
 
इंदिरानगर भागातील केंब्रिज शाळेने पाल्य, पालक अाणि शिक्षण विभागाचीही फसवणूक करीत पालकांना अंधारात ठेवून त्यांच्या पाल्यांना शिक्षणहक्क अंतर्गत प्रवेश दिल्याप्रकरणी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली. चाैकशी समितीमार्फत २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षात शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रियेत झालेल्या प्रवेशाच्या पूर्ण कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्यानंतर यात ८९ विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी केंब्रिज शाळेच्या २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षाच्या फाइलमध्ये दिसून आल्या हाेत्या. यानंतर यंदा २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षणहक्क अंतर्गत १०० प्रवेशांपैकी ५८ प्रवेश बोगस असल्याचे चौकशीत दिसून आले. चौकशीत सुरुवातीपासूनच अनेक त्रुटी दिसून अाल्या होत्या. चौकशी समितीमार्फत अधिक तपासणी केली असता अनेक पालकांचे उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले नसल्याचे दिसून आले आहे. तसेच केंब्रिज शाळेच्या शिक्षणहक्कमधील सर्वच फेऱ्यांमधील अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना अपुरे कागदपत्रे घेऊनच प्रवेश दिल्याचे चाैकशीत दिसून अाले होते. शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रियेत लाभार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची संपूर्ण जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांवर असल्याने या प्रवेशप्रक्रियेत झालेल्या सर्व घोटाळ्यात मुख्याध्यापकांना दोषी ठरवून समितीने शाळेच्या विश्वस्तांना मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. सोमवारी (दि. १९) शाळेच्या विश्वस्तांनी मुख्याध्यापक सोमू नादेर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून, या कारवाईची माहिती प्रशासनाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिली आहे. 

सर्च ऑपरेशमध्ये इंग्रजी शाळांची तपासणी सुरूच 
शिक्षणहक्कप्रवेशप्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची दखल घेत महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांकडून शहरातील सर्व इंग्रजी शाळांच्या सुरू असलेल्या ‘सर्च ऑपरेशन’मध्ये आतापर्यंत दहाहून अधिक शाळांचे तपासणीसाठी दप्तर जमा करण्यात आलेले आहे. यातील दोन शाळांची चौकशीही करण्यात आली असून, त्यात शाळेने संपूर्ण कागदपत्रे सादर केली आहे. तर इतर शाळांच्या संपूर्ण प्रवेशाची बारकाईने तपासणी केली जात असल्याचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले. 

कारवाई झाली, आता फेरप्रवेशप्रक्रिया 
^केंब्रिज शाळेत झालेल्या शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रियेची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर शाळा यात दोषी आढळून आली होती. शाळेत झालेल्या या सर्व प्रकाराबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे सूचना विश्वस्तांना दिले होते. सोमवारी मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता शिक्षणहक्क अंतर्गत झालेल्या सर्व प्रवेशांची फेरप्रवेशप्रक्रिया राबविण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. -नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, मनपा 

मुख्याध्यापकांना निलंबित केले.. 
^शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रियेसंदर्भात करण्यात आलेली चौकशीत मुख्याध्यापकांना दोषी ठरविण्यात आले होते. प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केली होती. आम्ही त्याचे पालन करत मुख्याध्यापकांवर कारवाई केली असून त्यांना निलंबित केले आहे. -राहुल रामचंद्रन, विश्वस्त, नाशिक केंब्रिज स्कूल 
 
बातम्या आणखी आहेत...