आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघड्यावरील अन्नपदार्थ विशेष तपासणी मोहीम, अन्न औषध प्रशासनाच्या पथकाकडून शहरात छापे सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील नागरिकांना स्वच्छ दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, तसेच उघड्यावर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांपासून पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळावे, या दुहेरी उद्देशाने अन्न औषध प्रशासनातर्फे विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध ठिकाणी अचानक छापे टाकले जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरात भेसळयुक्त अन्न मिठाईच्या विक्रीवर लक्ष्य केंद्रित करण्यात येत आहे. या माेहिमेंतर्गत शहरात विविध ठिकाणी छापे टाकून नुकताच सात लाखांवर गुटखा जप्त करण्यात आला. अन्न अौषध प्रशासनाने सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना चांगले अन्न मिळावे, तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्यदायी अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी पावले उचलली आहेत. पंचवटी, तपोवन आणि गोदाघाट परिसरासह शहराच्या विविध ठिकाणी मोहिमेंतर्गत प्रशासनाच्या पथकातर्फे खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री, वाहतूक विक्री होणाऱ्या ठिकाणी भेटी देऊन स्वच्छतेच्या दृष्टीने तपासणी करून नियमानुसार कारावाई केली जात आहे. मोहिमेप्रसंगी गरज भासल्यास खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते विश्लेषणासाठी पाठविण्याचे अधिकारही या पथकाला देण्यात आले आहेत. अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पी. आर. शिंगरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकात अन्न औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, प्रदीप कुटे, सुवर्णा महाजन, आर. डी. सूर्यवंशी, भरत इंगळे, अमित रासकर यांचा समावेश आहे.
यांच्यावर होणार कारवाई
निकृष्टदर्जाचा मावा, खवा, तसेच मिठाई विक्री करणारे व्यावसायिक, अनधिकृत मांसविक्रेते, वाहतूकदार आणि उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर सिंहस्थ कालावधीतही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री, वाहतूक विक्री होणाऱ्या ठिकाणी भेटी देऊन स्वच्छतेच्या दृष्टीने कारवाई हाती घेण्यात आली आहे.