आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट सिटी स्कॅन’ करणार कर्करोगाचे निश्चित निदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी स्कॅनिंग (पेट सिटी स्कॅन) मशीन शहरात दाखल झाले असून, यामुळे आता शरीरातील कोणत्या भागात व कोणत्या टप्प्यात कर्करोग आहे, याचे निश्चित निदान शक्य झाले आहे. साडेनऊ कोटी रुपये किमतीचे हे राज्यातील केवळ तिसरे मशीन आहे. यामुळे किमान 30 टक्के रुग्णांवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार शक्य होणार असल्याची माहिती क्युरी मानवता कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. राज नगरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिटी स्कॅन व एमआरआय या तपासण्यांचा पुढील टप्पा म्हणून या यंत्रणेकडे जगभर पाहिले जाते. यापूर्वी कर्करोग निदानासाठी सिटी स्कॅन, बायोप्सी, एमआरआयसारख्या चाचण्यांतून जावे लागत असे. आता केवळ पेट सिटी स्कॅन तपासणीतून कर्करोग आहे का व तो किती प्रमाणावर व शरीराच्या कोणत्या भागात आहे, याचे अचूक निदान करणे शक्य होईल. परिणामी उपचारांची योग्य दिशा ठरविता येतानाच अनावश्यक उपचारही टळणार आहेत. शिवाय, आजार पुन्हा येण्याची शक्यताही वर्तविता येत असल्याचे डॉ. अलोक पावसकर यांनी स्पष्ट केले.
तपासणी लाभदायी
कर्करोगाचे निदान किमान सहा महिन्यांपूर्वी करणे शक्य होते. यामुळे शस्त्रक्रियेऐवजी केवळ रेडिएशनद्वारे रुग्ण बरा होऊ शकतो, अन्य खर्चही टळतात. उपचार योग्य दिशेने होतो का, याची माहिती मिळते. बायोप्सीसाठीही मार्गदर्शक ठरते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर कोणत्या रक्तवाहिन्या कार्यरत आहेत याची माहिती मिळते व अनावश्यक बायपास टाळता येते.
15 मिनिटांत स्कॅन
रुग्णाला इंजेक्शनद्वारे ग्लुकोजचा (मिलीक्युरी) डोस दिल्यानंतर 15 मिनिटांत ते शरीरभर पसरते. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत स्कॅन होतो. ज्या भागात कर्करोग पेशी आहेत तेथे ग्लुकोज जास्त प्रमाणावर शोषले जाते व कर्करोग कुठे-कुठे आहे ते स्पष्ट होते. संपूर्ण शरीराच्या या तपासणीसाठी 18 हजार तर, विशिष्ट भागाच्या तपासणीकरिता 10 हजार रुपये शुल्क सध्या आकारले जात आहे.