आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेम्पो-कार अपघातात महिला, मुलगी ठार लोणीजवळील दुर्घटना; १३ जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणीजवळ झालेल्या अपघातात चक्काचूर झालेली तवेरा कार. - Divya Marathi
लोणीजवळ झालेल्या अपघातात चक्काचूर झालेली तवेरा कार.
राहाता-  मालवाहू टेम्पो तवेरा कारची समोरासमोर धडक होऊन दोन महिलांसह १२ वर्षांची मुलगी ठार झाली, तर १३ जण जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी सात वाजता लोणीपासून तीन किलोमीटर अंतरावर कोल्हार रस्त्यावर झाली. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत जखमी एकाच कुटुंबातील असून सिंगोल (बिहार) उंबरगाव, वलसाड (गुजरात) येथील रहिवासी आहेत.
 
चिंतादेवी झल्लर प्रसाद (४७), कमलादेवी प्रसाद (३५), सोनियाकुमारी प्रसाद (१२) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. मूळचे सिंगोल (बिहार) येथील राजेश झल्लर प्रसाद (३०) हे उंबरगाव वलझाड (गुजरात) येथे एका टेक्स्टाइल कंपनीत नोकरीला आहेत. काही दिवसांपूर्वी सिंगोल येथून त्यांच्या आई चिंतादेवी झल्लर प्रसाद (४७), बहीण रुबीदेवी गोपाल प्रसाद (३०), भाऊ मुकेश प्रसाद (३४) भावजय करुणादेव मुकेश प्रसाद (३०) मुलगा रंजनकुमार प्रसाद (१०), मुलगी सोनियाकुमारी प्रसाद (१२), काका रामविलास गणोरी प्रसाद (५०), दिव्याकुमारी प्रसाद (५) मावशी कमलादेवी प्रसाद, पुतण्या सत्यमकुमार प्रसाद (३), राम परवेश प्रसाद, भाऊ राहुल प्रसाद (२७) हे सर्व शिर्डी येथे दर्शनाला निघालेे होते. सोमवारी (७ सप्टेंबर) रात्री वाजता भाड्याची तवेरा मोटार (जीजे- १५, बीबी- १४३९) घेऊन गांधीनगर येथून नाशिकमार्गे शिर्डीला येत असताना रस्ता चुकल्याने ते संगमनेरमार्गे लोणीला पोहोचले. शिर्डीचा मार्ग लक्षात आल्याने त्यांचा गोंधळ उडाला. लोणीपासून किलोमीटर अंतरावर कोल्हारकडून येणाऱ्या आयशर मालवाहू टेम्पोला (एमएच ०४. एफबी- ६५१४) तवेराची जोरदार धडक बसून तवेरातील चिंतादेवी झल्लर प्रसाद, सोनियाकुमारी प्रसाद, कमलादेवी प्रसाद या तिघी जागीच ठार झाल्या.

तवेराचालक महेशभाई भानाभाई पटेल (३२) याच्यासह मोटारीतील १२ जण जखमी झाले. चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालवाहू टेम्पो चालक मोहम्मद कुरेशी (मुजापूर, भिवंडी) गंभीर जखमी आहे. नगर येथून म्हशी घेऊन हा टेम्पो नाशिकडे निघाला होता. अपघाताची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले. तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद पाटील करत आहेत.
 
खराब रस्ता अन् अपघात
लोणीपासून प्रवरानगर फाट्यापर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. २९ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली गेली, पण ती आठवडाभरही टिकली नाही. या रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवण्याच्या नादात तवेरा टेम्पोला धडकल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

...तर ती वाचली असती
हाकेच्याअंतरावर असलेल्या अपघातस्थळी पोलिस लवकर पोहोचले असते, तर १२ वर्षांची सोनियाकुमारी वाचली असती, असे मदत करणाऱ्यांनी सांगितले.