आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनतळाचा नाही पत्ता, पण दंड वसुलीची सत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहनतळांचा प्रश्न गंभीर होत असतानाच मनपा आणि पोलिसांकडून नो पार्किंगच्या नावाखाली सर्रास दंडात्मक कारवाई संयुक्तपणे केली जात आहे. मुळात पार्किंगचा किंवा नो पार्किंगचा कुठलाही फलक नसतानाही वाहने उचलून नेण्याच्या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच हा प्रकार वाहनचालकाच्या लक्षात वेळीच आला आणि वाहन नेणार्‍या टेम्पोमागे धावत जाऊन थांबविल्यास जागेवरच 100 ते 150 रुपयांचा विनापावती दंड वसूल केला जात असल्याने अशा वाहनधारकांची एक प्रकारे लूटमारच केली जात असल्याचे लक्षात येते. त्या प्रकारावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला प्रकाशझोत..

शहरातील रस्त्यावर अनधिकृतपणे उभी केलेली वाहने उचलण्याचा ठेका महापालिकेने खासगी कंपनीला दिलेला आहे. त्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेची मदत घेण्यात येते. वाहतूक शाखेचे पोलिस व कंपनी ठेकेदाराचे उर्मट कामगार ही सर्व मंडळी नाशिकच्या वाहतुकीला शिस्त लावायला निघाली आहे. त्यामुळे दिसली गाडी की काटा लावला जातो, दिसली दुचाकी की कचर्‍यासारखी उचलली जाते. असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने या ठेक्यातून 60 टक्के ठेकेदाराचे आणि 40 टक्के पालिकेला असे उत्पन्न वाटून घेण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पन्न पदरात पाडून घेण्यासाठी ठेकेदाराची ही कारवाई सकाळपासून सुरू होते. ती सायंकाळी अंधार पडेपर्यंत सुरू असते.

वाहन नेमके कुठे उभे करायचे?
नागरिकांनी वाहन नेमके कुठे उभे करायचे, याचे फलक लावून वाहनतळ दाखवावे. शालिमार, अशोकस्तंभ, सीबीएससह शरणपूररोड भागात हॉस्पिटल, शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त गेले, तरी अभ्यागतांची वाहने उचलून नेली जातात.

मुळात अशा ठिकाणी येणारा प्रत्येक वाहनचालक आपापल्या कौटुंबिक विवंचनेत असताना त्याची वाहने उचलून त्यांना प्रचंड मनस्ताप दिला जातो. त्यामुळे मनपा आणि पोलिस यंत्रणेने नागरिकांच्या सोयीसाठी अगोदर वाहनतळे निर्माण करावी, फलक लावावा, त्यानंतर कोणी नियम मोडला मग कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कर्मचार्‍यांची मग्रुरी;महिलांना धावावे लागते मागे
वाहने उचलून नेणार्‍या टेम्पोतील कामगार आणि वाहने जमा केली जातात त्या ठिकाणी पोलिस, मनपा कर्मचार्‍यांसोबत ठेकेदाराची माणसेही उभी राहतात. वाहने उचलून नेताना आणि वाहनमालक त्यांना विनवण्या करू लागताच त्यांच्या मग्रुरीचा प्रत्यय येतो. महिला, वृद्ध वाहनचालकांनी विनवणी केल्यावर उर्मटपणे उत्तरे दिली जातात. काही वेळा ठेकेदाराचे कामगारच त्यांना बाजूला घेत ‘250 रुपयांची पावती घेण्यापेक्षा 150 रुपये देऊन टाका, गाडी सोडून देतो’, असे सांगण्याचाही अनुभव चालकांना येतो. नवीन बसस्थानक, मेनरोड, शालिमार चौक, आदर्श विद्यालय, बिटको हायस्कूल येथे लहान मुले सोबत घेऊन येणार्‍या महिलांच्या दुचाकी उचलून नेल्याचे दिसताच त्यांना टेम्पोमागे धावत जावे लागत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते.

इथे आहे वाहनतळ
सीबीएस, स्वामिनारायण मंदिर, काळाराम मंदिर, सराफ बाजार, तपोवन, दामोदर सिनेमामागे, चित्रमंदिर सिनेमामागे, गोदावरी घाटावर, कॅनडा कॉर्नर, पंचवटी कारंजासमोर, सीतागुंफा परिसर या ठिकाणी वाहनतळे देण्यात आली आहेत. परंतु, या ठिकाणी वाहनतळ आहे, हे समजण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फलक नाही. शहरात कोणत्याही ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ आहे, याचीही नागरिकांना माहिती देणारा फलक महापालिकेने लावलेला नाही.

थेट प्रश्न
आर .एम. बहिरम पालिका उपायुक्त (अतिक्रमण विभाग)
0शहरात किती वाहनतळे आहेत?
शहरात किती वाहनतळे आहेत, याच्या आकडेवारीसाठी आता फाइल बघावी लागेल.
0वाहनतळांच्या ठिकाणी फलक का लावले नाहीत?
फलक लावले तरच तुम्ही त्या ठिकाणी वाहने उभी करणार का? आणि नो पार्किंगच्या ठिकाणी फलक असल्यास तिथे वाहन का उभे करता?
0ठेकेदारांकडून वाहन उचलताना वाहनांची मोडतोड केली जाते. अशी तक्रार दिल्यावर तुम्ही ठेकेदारांवर कारवाई करणार का?
ठेकेदारांवर आम्ही कारवाई करू शकत नाही. कारण त्यांच्याबरोबर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी असतात. ही त्यांची जबाबदारी आहे.
0वाहन नेमके कुठे पार्क कारायचे?
- शहरात काही ठिकाणी वाहनतळे निश्चित केलेली आहेत. तिथे पार्क करा. रस्त्यावर कराल तर ते कारवाई तर करणारच ना. महापालिका ठेकेदारांना याबाबत सूचना देऊ शकत नाही.

बाइकचे हॅण्डल तुटले
सिटी सेंटर मॉलजवळ माझी बाइक उचलून नेल्यावर 250 रुपयांची पावती फाडून गाडी सोडवली. उचलताना हॅण्डल तुटले. दुरुस्तीला दोन हजार रुपये लागले. हे त्रासदायक, नुकसानदायक आहे. कचरू गायकवाड, नागरिक

निष्काळजीपणा
कर्मचार्‍यांकडून दुचाकी उचलताना दक्षता घेतली जात नाही. हॅण्डल लॉक, हेडलाइटची तुटफूट होते. वाहनतळांची माहिती देणारा एकही फलक लावलेला नाही. याचा त्रास सहन करावा लागतो. आनंद भारस्कर, नागरिक

गैरमार्गाची वसुली थांबवा
गैरमार्गाने नागरिकांकडून होणारी वसुली त्वरित थांबवावी. तसेच, मनपा आणि पोलिस यंत्रणेने अगोदर वाहनतळे निर्माण करावी, फलक लावावे, मगच कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू. आदिल सिद्दिकी, सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

आपण दोन तास बोलू
हा तर मोठा इश्यू आहे. तुम्ही मला येऊन भेटा. आपण त्यावर दोन तास बसून बोलू. कारण ही महत्त्वाची गोष्ट आहे. तसाही मी फोनवर बोलत नाही. संजय ठाकूर, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा