नाशिक - अठराविश्व दारिद्र्य असलेल्या आदिवासी पाड्यांवरील मुलांना शिक्षणासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे कार्य केअर रिसर्च फाउंडेशनद्वारे येत्या शैक्षणिक वर्षात केले जाणार आहे. ‘केअर’च्या समाजसेवा उपक्रमांतर्गत ५०० गरीब गरजू मुलांना मदतीचा हात दिला जाणार आहे. त्र्यंबक, हरसूल, पेठ, सुरगाणा या भागातील आदिवासी पाड्यांवरील गरजवंतांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केअर रिसर्च फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अनोखी मोहीम हाती घेतली आहे.
आदिवासी पाड्यांवरील मुलांना तसेच ग्रामीण भागातील आश्रमशाळेतील गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी फाउंडेशनने साहित्य खरेदी केले आहे. तसेच, शहरातील दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जाऊन फाउंडेशनच्या पदाधिकार्यांनी शैक्षणिक साहित्यामधील वह्या, पुस्तके, गणवेश, स्टेशनरी, पाण्याच्या बाटल्या, खेळणीचे साहित्य संकलित केले आहेत. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या भागांमधील नागरिकांशी संवाद साधून त्यांना या उपक्रमाविषयी माहिती देऊन त्यांच्याकडून काही साहित्य जमवले आहे. फाउंडेशनही संकलित केलेले हे साहित्य आदिवासी पाड्यांवरील ५०० मुलांना वाटप करणार आहे. शैक्षणिक साहित्याचा खर्च परवडत नसल्याने आदिवासी पाड्यांवरील अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात.
सहभागी शाळांतील मुलांसाठी सहल
केअ रिरसर्च फाउंडेशनच्या या उपक्रमात सहभागी होणार्या शाळांतील मुलांसाठी सहलीचे आयोजन केले जाणार आहे. शिक्षणाबरोबरच मनोरंजन आणि निसर्ग पर्यटनाची माहिती या मुलांना करून दिली जाणार आहे. अजयशुक्ला, प्रमुख, केअर रिसर्च फाउंडेशन
मदतीचे आवाहन
या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. त्यात सहभागी होण्यासाठी तसेच कोणाकडे काही वापरलेले चांगले शैक्षणिक साहित्य असेल तर ते जमा करू शकतात. त्यासाठी ८४०८९४०१२२ ९०२१२१७११० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी डिंपी चक्रवती, रोहन गांगुर्डे, सुमेध बागुल, सचिन देशमुख, करिश्मा शुक्ला आदी प्रयत्न करीत आहेत.