आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी ‘कॅरी ऑन’; चेंडू कुलगुरूंच्या कोर्टात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अभियांत्रिकी शाखेतील 2008 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची पद्धती लागू करावी, या मागणीसाठी राष्ट्र वादी काँग्रेसचे पंचवटी विभाग अध्यक्ष देवांग जानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली.

या वेळी कॅरी ऑनच्या मुद्यावरील चर्चेनंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसल्याची हमी टोपे यांनी दिली. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या (पुणे विद्यापीठ) कुलगुरूंशी चर्चा करून कॅरी ऑनबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही टोपे यांनी सांगितले.

मे-जून 2014 च्या द्वितीय आणि तृतीय वर्ष अभियांत्रिकी 2000 पॅटर्नचा निकाल 15 जुलै व 19 जुलै 2014 रोजी जाहीर करण्यात आला. या निकालानंतर हजारो विद्यार्थी क्रिटिकल आणि रेग्युलर अभ्यासक्रमाकडे शेवटच्या वर्षासाठी पात्र होऊ शकले नाहीत. हे अपात्र ठरलेले सर्व विद्यार्थी एक वर्षानंतर शेवटच्या वर्षात प्रवेश घेतील, तेव्हा त्यांना ब-याच समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे 2008 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू करावा, अशी मागणी टोपे यांच्याकडे करण्यात आली. ‘कॅरी ऑन’बाबतचा निर्णय सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही टोपे यांनी सांगितले.

- सध्या शेवटच्या वर्षात प्रवेश करणारी बॅच ही 2008 पॅटर्नची शेवटची बॅच आहे. नंतर येणा-या बॅचला 2012 पॅटर्नप्रमाणे परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे परीक्षेच्या नवीन पॅटर्नशी जुळवून घेण्यात समस्या निर्माण होईल व त्याचा परिणाम शेवटच्या वर्षाच्या गुणांमध्ये होईल.
- 2008 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन न लागता पुढील वर्षी 2012 पॅटर्नप्रमाणे परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे काही विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागेल व काही विषय शिकवताच येणार नाही.
- सद्यस्थितीत एमएसबीटीई तंत्रनिकेतनमध्ये 2010-11 साठी पूर्णपणे कॅरी ऑन लागू करण्यात आला. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचले होते. तो आजही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लागू आहे.
- नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार हजारो विद्यार्थी नापास झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू न केल्यास तेवढच्याच विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्यासोबत विद्यापीठावर तेवढा बोजा वाढेल. 2013 पॅटर्नमध्ये कॅरी ऑन लागू न झाल्याने बरेच विद्यार्थी आजही पेपर देत आहेत व नवीन पॅटर्नशी जुळवून घ्यायला त्यांना अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून 2008 पॅटर्नसाठी कॅरी ऑन लागू व्हावा.
- शासकीय महाविद्यालय व इतर विद्यापीठांमध्ये बॅकलॉक पेपर 15 दिवस ते 2 महिन्यांत घेण्यात येतात. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता कमी होते. पुणे विद्यापीठात तसा कोणताही नियम नसल्याने कॅरी ऑन लागू करण्यात यावा.
- 2008 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स हे अवघड विषय सोपे व्हावे म्हणून विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होणे सोयीस्कर व्हावे, यासाठी 50-50 पॅटर्न न मागताही लागू करण्यात आला होता. त्यानंतर 2012 पॅटर्नमध्ये हीच पद्धती सर्व विषयांसाठी लागू करण्यात आली, असाच विद्यार्थ्यांना सोयीचा कॅरी ऑनचा नियम विद्यापीठाने लागू करावा.
- कॅरी ऑनचा नियम विद्यापीठाला मान्यच नसेल तर सर्व विद्यार्थ्यांचे सर्व विषयांचा कट ऑफ 25 गुण करावेत.