आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅरीऑन न दिल्यास मतदानावर बहिष्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अभियांत्रिकीच्या निकालात 2008 पॅटर्नच्या तिसर्‍या वर्षाचे अनेक विद्यार्थी नापास झाले. पेपर फेरतपासणीसह द्वितीय व तृतीय वर्षाच्या काही विषयांत नापास विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’ पद्धत लागू करून अंतिम वर्षात प्रवेश द्यावा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत कुटुंबासह मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला. दरम्यान, सोमवारी यासंदर्भात पुणे येथे कुलगुरूंसमवेत बैठक होणार असल्याने तोडगा निघण्याची शक्यता आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील विभागीय कार्यालयात शुक्रवारी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. ‘कॅरी ऑन मिळालेच पाहिजे’, ‘विद्यापीठ प्रशासनाचा धिक्कार असो’ अशी प्रचंड घोषणाबाजी करत विभागीय अधिकारी डॉ. एस. डी. श्रीवास्तव यांना घेराव घातला. अखेर पोलिस हजर होताच काही प्रमाणात नियंत्रण आले.

दरम्यान, अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे आणि सिनेट सदस्य मिलिंद वाघ यांनी मागण्या विद्यापीठाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. मनविसेचे संदीप भवर, छावा कृती समितीचे प्रमोद बोरसे, किशोर पारखे, हर्षद पवार, राष्ट्रवादी युवकचे धीरज मगर, विक्रम धोंडगे यांच्यासह शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांनी श्रीवास्तव यांच्या दालनात गोंधळ घातला.

निर्णय लागू करावा
मी तिसर्‍या वर्षाचे सर्व विषय उत्तीर्ण आहे. दुसर्‍या वर्षाचा एक विषय राहिला आहे. कॅरीऑनशिवाय वर्ष वाया जाईल. आता मी मतदानच करणार नाही. आनंदिता हेमाडी, विद्यार्थिनी

महत्त्वाचा निर्णय
कॅरीऑन विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय आहे. विद्यापीठाने तो लागू करावा. शासन आम्हाला मदत करत नसेल तर आम्हीही कुंटुंबासह मतदानावर बहिष्कार टाकू. अश्विनी इंगोले, विद्यार्थिनी

कॅरी ऑन कशासाठी
2012 च्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या पॅटर्नचे विद्यार्थी दुसर्‍या वर्षात, तर 2008 पॅटर्नचे तृतीय वर्षात आहेत. या पॅटर्नच्या तृतीय वर्षाच्या काहींचे द्वितीय व तृतीय वर्षातील विषय राहिले आहेत. मात्र अंतिम वर्षात प्रवेशासाठी सर्व विषय उत्तीर्ण हवेत. परंतु बदलामुळे 2008 पॅटर्नचे विद्यार्थी उत्तीर्ण होईपर्यंत 2012 चा पॅटर्न लागू होईल. कारण तेव्हा हे विद्यार्थी अंतिम वर्षासाठी नव्याने प्रवेश घेणार असतील. म्हणून त्यांना अंतिम वर्षासाठी 2012 च्या पॅटर्नला प्रवेश घ्यावा लागेल. त्यात मेकॅनिकलचे उदाहरण घेतल्यास ‘आरएसी’सारखे विषय पुन: पुन्हा शिकावे लागतील. अंतिम वर्षाच्या ‘आयएफपी’सारखे विषय शिकताच येणार नाहीत. त्यामुळे 2008 चा पॅटर्न असलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे द्वितीय वा तृतीय वर्षाचे विषय राहिले तरीही त्यांनी अंतिम वर्षाला प्रवेश द्यावा. ते राहिलेले विषय दरम्यानच्या काळात उत्तीर्ण होतील, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यावेळी पेपर तपासणीतही मोठा घोळ झाला आहे. डिस्टिंक्शन मिळालेले अनेक विद्यार्थी तृतीय वर्षाला सर्व अथवा काही विषय नापास झाले आहेत. अनेकांच्या निकालात गोंधळ आहे. फोटोकॉपीही उशिरा मिळत असल्याने पास असूनही वर्ष वाया जाईल. शिवाय अनेकदा फोटोकॉपीनंतर गुण वाढण्याची शक्यता असली तरीही फेरतपासणीत बदलच होत नसल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासह पेपर विनामूल्य पुन्हा तपासण्याची मागणी त्यांनी केली.