आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#DMLF- व्यंगचित्रं टिकली तरच लोकशाही जिवंत राहील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - व्यंगचित्रे ही साहित्याचाच एक भाग आहेत. किंबहुना ती साहित्याहून अधिक उजवी आहेत. ब्रिटिशांच्या काळापासून आलेली ही कला सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत आली आहे. या माध्यमातून समाज सुधारला तरच व्यंगचित्रकार सुखी हाेईल आणि व्यंगचित्रे टिकली तरच लाेकशाही जिवंत राहील, असे मत प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘सामाजिक व्यंगचित्रे’ या विषयावर कुलकर्णी यांनी दिलखुलास मते मांडली. शिवाय, जागतिक पातळीवर नाव कमावलेल्या व्यंगचित्रकारांची विचारशैली, कुंचल्यांचे स्ट्रोक्स आणि बारकावे मांडण्याची पद्धत याविषयी अतिशय तपशिलाने माहिती सांगितली. त्यातील अनेक पैलू उलगडूनही सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या प्रभावी व्यंगचित्रांचे दाखले देत ही चित्रे समाजजीवनावर कशी प्रभाव टाकतात, हे सप्रमाण दाखवून दिले. पुण्यातील सामाजिक प्रश्नावर रंगरेषांतून मार्मिक भाष्य करणाऱ्या फडणीसांच्या चित्रांना यावेळी उपस्थित रसिकांनी हास्याच्या गडगडाटाने दाद दिली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम व्यंगचित्रकार गाइल्स (इंग्लंड), सर्जिओ, लार्सन (अमेरिका), स्टाइनबर्ग, सेपे कोणत्या नजरेतून समाजाकडे, घटनांकडे पाहतात आणि मनातील विचार कॅनव्हासवर कसा उतरवतात, हे सांगताना कुलकर्णी यांनी काही मार्मिक टिप्पण्याही केल्या. व्यंगचित्रकारांच्या कलाकृतीतील बारकावे त्यांनी रसिकांना छोट्या पडद्यावर दाखवले. उपस्थितांनीही या दिग्गज कलावंतांच्या व्यंगचित्रांना कधी स्मित हास्याने, तर कधी हास्याचा गडगडाट करत उत्स्फूर्त दाद दिली. ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी बदलत्या समाजजीवनावर रंगरेषेतून केलेल्या मार्मिक भाष्याचाही कुलकर्णी यांनी आवर्जून उल्लेख केला. त्यांची चित्रे प्रत्येक वाचकाला गांभीर्याने विचार करायला भाग पाडतात, याची अनुभूतीही एका दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर सरवटे यांनी साकारलेल्या चित्रातून दिसून आली. ‘दिव्य मराठी’चे नाशिकचे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांच्या हस्ते कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दीप्ती राऊत व गरिमा तिवारी यांनी केले.

व्यंगचित्रकारांवर हल्ले चिंताजनक
गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त व्यंगचित्रांमुळे जग ढवळून निघाले आहे. व्यंगचित्रकारांवर हिंसक हल्ले होत आहेत. महिनाभरापूर्वी महाराष्ट्रातही एका व्यंगचित्रावर तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. त्याचे राजकीय पडसादही उमटले होते. तो धागा पकडत कुलकर्णी यांनी ख्यातनाम व्यंगचित्रकार गाइल्स याने रेखाटलेल्या व्यंगचित्राचे उदाहरण दिले. त्यात चर्चमधून अर्धनग्न अवस्थेतील महिला बाहेर पडताना दाखवले होते आणि या महिला चर्चचे प्रमुख फादर पाहत असल्याचेही ठळकपणे मांडले होते. असे व्यंगचित्र आपल्याकडे चालेल का? आपण लगेच भावना दुखावल्या असे म्हणत आंदोलन करू. केंद्रातील, राज्यातील सरकार बदलून टाकू. खरे तर एखादे व्यंगचित्र आवडले तर स्वीकारावे आणि नाहीच आवडले तर सोडून द्यावे. त्याविरोधात ओरड करून आपल्याला सेन्स ऑफ ह्युमर (व्यंगाविषयी जाणीव) नसल्याचे जगाला का दाखवता, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...