आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात पडताळणी; अध्यक्षांच्याच स्वाक्षरीविना हजाराे प्रकरणे प्रलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विभागीय समितीमार्फत नाशिक आणि नगर जिल्ह्यातील विद्यार्थी, शासकीय-निमशासकीय सेवेतील कर्मचारी आणि निवडणुकीतील विजेत्या उमेदवारांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीचे काम चालते. विभागीय समितीचे अध्यक्ष आणि महसूल विभागाचे अपर जिल्हाधिकारी पी. टी. वायचळ यांनी नाशिक समितीचा पदभार स्वीकारला खरा, मात्र वायचळ दीड महिन्यापासून कार्यालयातच फिरकले नसल्याने समितीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असल्याची बाब ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाली अाहे.
नाशिक विभागीय समितीला दीड वर्षापासून कायमस्वरूपी अध्यक्ष मिळालेला नाही. तरीही येथील प्रकरणांचा निपटारा सुरळीत सुरू होता. मात्र, वायचळ यांच्याकडे जुलै २०१६ पासून समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविल्यापासून अद्यापपर्यंत ते कार्यालयात फिरकले नसल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, समितीच्या दोन्ही सदस्यांनी स्वाक्षरी केलेली प्रकरणेही अध्यक्ष सोबत घेऊन गेले असून, अद्यापपर्यंत ते कार्यालयात पाठविले नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्याने प्रकरणे प्रलंबित पडण्याचे प्रमाण वाढले अाहे. एकूणच अध्यक्ष मिळाल्याने अडचणी साेप्या हाेण्यापेक्षा अधिक वाढल्या अाहेत.
विद्यार्थी, शासकीय- निमशासकीय सेवेतील कर्मचारी आणि निवडणुकीतील विजेत्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले जातप्रमाणपत्र पडताळणीची कामे गेल्या तीन महिन्यांपासून पूर्णपणे बंद असल्याची धक्कादायक माहिती ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत समोर आली आहे. विशेष म्हणजे, जातप्रमाणपत्र पडताळणी अध्यक्षांची नियुक्ती झाली असली तरी गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या स्वाक्षरीविना तब्बल हजार ८४ प्रमाणपत्रे धूळखात पडून असल्याचेही पाहणीत समोर आले आहे. यामुळे अर्जदारांना वारंवार कार्यालयाचे उंबरे झिजवावेे लागत असून, विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत अाहे. यावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...

संथगतीने कामकाज
शासनाने जिल्हानिहाय जातपडताळणी समितीचा निर्णय घेतला आहे. मात्र, महसूल विभागाकडून आवश्यकतेनुसार अध्यक्ष उपलब्ध नसल्याने कामकाज अधिक संथगतीने होत आहे. सद्यस्थितीत शासनाने १५ कार्यरत अध्यक्षांकडे ३६ समित्यांचा कार्यभार सोपविला आहे.
प्रलंबित प्रकरणे अशी
१६००: शैक्षणिक
८३४ : सेवा
६५० : निवडणूक

शासनाचे दुर्लक्षच
अध्यक्ष वायचळ दीड महिन्यांपासून कार्यालयातच फिरकलेले नाहीत. त्यामुळे समितीचे कामकाज पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे ज्या अर्जदारांना पडताळणीसाठी अर्ज केले होते, त्या अर्जदारांना त्यांच्या प्रकरणांबाबत उत्तर देताना समाजकल्याण विभागाच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाची दमछाक होत आहे. समितीने याबाबत पुणे येथील बार्टीचे संचालक यांच्या निदर्शनास ही बाब अाणून दिली अाहे. त्याबाबत शासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

अर्जदारांना माराव्या लागतात वारंवार फेऱ्या
समितीच्या दोन्ही सदस्यांच्या स्वाक्षऱ्या होऊनही अध्यक्षांच्या स्वाक्षरीविना हजार ८४ प्रमाणपत्र पडून आहेत. यामुळे अर्जदारांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. तर, गेल्या दाेन महिन्यांपासून दाखले प्रलंबित ठेवल्यामुळे तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या या मनमानीमुळे समाजकल्याण विभागाची मोठी बदनामी होत आहे.

वायचळ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
पी. टी. वायचळ यांची नियुक्ती महसूल विभागाने जिल्हा समिती, अहमदनगर येथे केली आहे. मात्र, जिल्हा समितीचे कामकाज अद्याप सुरू झालेले नसून, कार्यालयही अद्यााप कार्यान्वित झालेले नाही. तसेच, त्या ठिकाणी कर्मचारीदेखील उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडे अाता नाशिक समितीचा अतिरिक्त कार्यभार प्रशासनाकडून सोपविण्यात आलेला आहे.

असंख्य प्रकरणे पडली धूळखात
जातप्रमाणपत्रपडताळणीची कामे गेल्या तीन महिन्यांपासून पूर्णपणे बंद पडली असल्याने समाजकल्याण विभागात दाखल झालेली प्रकरणे माेठ्या प्रमाणावर धूळखात पडली आहेत. तर, समितीच्या दोन्ही सदस्यांनी स्वाक्षरी केलेली काही प्रकरणेही अध्यक्ष पी. टी. वायचळ यांनी स्वाक्षरीसाठी सोबत अहमदनगरला नेली असल्याने कामकाजात अड‌थळे येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

केवळ अध्यक्षांची स्वाक्षरी बाकी...
राजेंद्र कलाल, प्रादेशिकउपायुक्त, जातपडताळणी विभाग, समाजकल्याण
{ गेल्या काही महिन्यांपासून जातप्रमाणपत्र पडताळणीची कामे बंद आहे, काय कारण?
-दोन महिन्यांपूर्वी विभागीय समितीचे अध्यक्ष आणि महसूल विभागाचे अपर जिल्हाधिकारी पी. टी. वायचळ यांनी नाशिक समितीचा पदभार स्वीकारला. त्यांच्याकडे नगरच्या जिल्हा समितीचाही अतिरिक्त चार्ज असल्याने त्यांनी अद्याप प्रकरणांवर स्वाक्षरी केलेली नाही.
{साधारणत: जातप्रमाणपत्र पडताळणीची किती प्रकरणे स्वाक्षरीविना प्रलंबित आहेत?
-समितीच्या दोन्ही सदस्यांनी स्वाक्षऱ्या केलेली असून, फक्त अध्यक्षांच्या स्वाक्षरीविना हजार ८४ प्रमाणपत्रे पडून आहेत.
{अर्जदारांना लवकरात लवकर दाखले देण्याबाबत काय ठाेस उपाययोजना केल्या आहेत?
-समाजकल्याण विभागामार्फत दाखल्यावरील होणारी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असून, फक्त अध्यक्षांची स्वाक्षरी बाकी आहे. याबाबत वारंवार त्यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला जात आहे. लवकरच ही सर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी विभागीय अायुक्तांची भेट घेणार आहे.
बातम्या आणखी आहेत...