आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासर्डीजवळ सापडले बेवारस मृत अर्भक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - द्वारका-वडाळागाव मार्गावर नासर्डी नदीवरील पुलाखाली रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. या अर्भकाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. माहिती मिळताच भद्रकाली व इंदिरानगर ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र हद्दीच्या वादावरून कोणत्या ठाण्यात नोंद करायची यावरून अधिकार्‍यांमध्येच बराच वेळ वादंग सुरू होते. अखेर भद्रकाली पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी अर्भकाला ताब्यात घेतले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात या अर्भकाचे शव विच्छेदनासाठी दाखल केले. त्यानंतर अर्भकाची नोंद अखेर इंदिरानगर पोलिस ठाण्यात करण्यात आली. राज्यात सध्या स्त्रीभ्रूण हत्या, बालकांची पळवापळवी आदी प्रश्न गाजत असतानाच आणि या प्रश्नी जोरदार खळबळ सुरू असतानाच शहरात बेवारस अर्भक सापडल्याने नागरिकांमध्ये या प्रकरणी चर्चेला उधाण आले होते.
नासर्डी नदीच्या पुलाखाली लहान मुलांना खेळता खेळता काठीला प्लास्टिकची पिशवी लागल्याचे दिसून आले. पिशवीत काहीतरी असल्याची चाहूल लागल्याने मुलांनी उत्सुकतेपोटी पिशवी उघडून पाहिली. त्यावेळी पिशवीत नवजात अर्भक दिसल्याने मुलांनी परिसरातील शेख यांना ही माहिती सांगितली. त्यांनी भद्रकाली व इंदिरानगर ठाण्याला दूरध्वनीवरून या घटनेची माहिती सांगितली.
दोन्ही ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. परंतु पूर्वीपासूनच हा पूल भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो तर नवीन कर्मचार्‍यांना हद्द माहिती नसल्याने इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो या वादावरून पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांमध्येच खडाजंगी झाली. बराच वेळ चर्चा सुरू होती. अखेर भद्रकाली पोलिसांनी या अर्भकाला ताब्यात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या वेळी शवविच्छेदनावरून अर्भक हे पुरुष जातीचे असल्याचे सिध्द झाले असून, अनैतिक संबंधातून हे बालक जन्माला आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
ती हद्द इंदिरानगर पोलिस ठाण्याचीच - दोन पोलिस ठाण्याच्या हद्दीवरून नागरिकांसमोर चर्चा झाल्यामुळे नागरिकांनी कोणाकडे दाद मागण्यासाठी वा न्यायासाठी जायचे अशी चर्चा सुरू होती. हो-नाही करता करता अखेर भद्रकाली पोलिसांनी त्या अर्भकाला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तीन ते चार तासांच्या प्रतीक्षेनंतर अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी भद्रकाली पोलिस ठाण्याचे कर्मचारी अर्भकांची नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात आले तेव्हा त्यांना इंदिरानगर पोलिस ठाण्यात त्याची नोंद करण्यासाठी सांगितले. तेव्हा त्या अर्भकाची कागदपत्रे घेऊन नोंद करण्यासाठी इंदिरानगर पोलिस ठाण्यात उशिराने नोंद करण्यात आली. अर्भकाच्या क्रूर माता-पित्याने बेवारस स्थितीत टाकून दिल्यानंतरही त्या अर्भकाबाबत पोलिसांच्या हद्दीवरून वाद होता.