आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दणका - गर्भपातावरील औषधे विकणार्‍यांवर बडगा ; औषधे विक्रेत्यांचे दणाणले धाबे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गर्भपाताच्या औषधांची विक्री करणार्‍या मेडिकल आणि त्या गोळ्या घेण्यासाठी रुग्णांना भाग पाडणार्‍या डॉक्टरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आलेली असताना आता ज्या औषध विक्रेत्यांकडे स्वत:ची पदवी, परवाना नसल्याचे आढळून आले आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून शहरात ही शोधमोहीम सुरू करताच यातील बड्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
बीडच्या घटनेनंतर स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर, जिल्हय़ासह धुळे, जळगाव, अहमदनगर जिल्हय़ातील मेडिकल स्टोअर्स, घाऊक औषध विक्रेते व डॉक्टरांची तपासणी केली जात आहे. संबंधित डॉक्टरांकडून गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रिपशन लिहून दिली जात असल्याचे आढळून आल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. आतापर्यंत दिंडोरी येथील डॉक्टरसह जळगाव येथील दोघा औषध विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक शहर व जिल्हय़ातील 92 औषध विक्रेते व 28 घाऊक विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली असताना त्यातील 29 विक्रेत्यांकडे कागदपत्रे आढळून आलेले नाहीत. या विक्रेत्यांना नोटिसा देण्यात आल्या असून, बहुतांशी विक्रेत्यांकडून सर्मपक उत्तरे न आल्याने त्यांचे परवानेदेखील सोमवारपासून रद्द करण्यात येणार आहेत. दरम्यान, काही दुकाने एकाच औषध निर्मात्याच्या परवान्यावर सुरू असल्याचे, तर काही दुकानदारांकडे ना पदविका ना औषध विक्रीचा परवाना आढळून आला.
एकाचीच दोन दुकाने कार्यरत - अन्न व औषध प्रशासनाच्या शोध मोहिमेत नाशिक शहरात किमान दहा औषधे विक्रेत्यांकडे परवाने नसल्याचे आढळून आले. अनेकांकडे डी. अथवा बी.फार्मसी पदवीदेखील नसल्याचे आढळून आले. घाऊक विक्रेत्यांच्या औषधे विक्री परवान्याचा आधार घेत एक, दोन नव्हे तर तीन-चार औषधे विक्रीची नियमबाह्य दुकानेदेखील सुरू आहेत. या दुकानदारांना नोटिसा देताच त्यांनी दुकाने बंद केली असली तरी कॉलेजरोड परिसरातील एका प्रख्यात हॉस्पिटलमधील औषध विक्रेत्याने दोन दिवसांनंतर मात्र बाहेरून दुकान बंद ठेवत आतील बाजूने व्यवसाय सुरू ठेवला आहे.
बोगस विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करणार - औषधे विक्रीचा परवाना व पदव्या नसताना बेकायदेशीरपणे व्यवसाय करणार्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांनी परवाने सादर न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. गर्भपाताची औषधे विक्री प्रकरणात दोषी आढळून आलेल्या विभागातील किमान 25 हून अधिक विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आली आहे.सुहास चौधरी, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन