आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिश्चन समाजाकडून आरक्षणाचा आग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - न्या. रंगनाथ मिश्रा यांच्या शिफारशीनुसार ख्रिश्चन समाजाला शिक्षण क्षेत्रात व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे यासह समाजाच्या विविध मागण्यांना मंजुरी मिळण्यासाठी ख्रिश्चन एकता मंच मनमाड शाखेतर्फे जुन्या नगरपालिका कार्यालयाजवळ सोमवारी लाक्षणिक उपोषण
करण्यात आले.

महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाजाचा इतर समाजांप्रमाणेच विकास होणे गरजेचे असून, तो घटनेप्रमाणे आमचा अधिकार आहे. यासह इतर प्रमुख 13 मागण्यांसाठी सर्व ख्रिश्चन बांधव या उपोषणात सहभागी होते. अध्यक्ष शिमोन पाटोळे, सचिव डेव्हिड नागिलकर, प्रशांत केदारी, अण्णासाहेब खरात, नीलेश सपकाळे, विजयानंद देठे, जोसेफ मॅन्युअल, माणिक जाधव, रजनीकांत काळे, हनोख बेन्सन, विजयानंद अस्वले आदींसह ख्रिश्चन एकता मंचचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उपोषणात भाग घेतला.

समाजाला विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त प्रतिनिधित्व, अल्पसंख्याक आयोगावर दोन ख्रिश्चन सदस्यांची नियुक्ती, भारतरत्न मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, वक्फ बोर्डाच्या धर्तीवर ख्रिश्चन समाजाच्या मालमत्तांच्या संरक्षणासाठी ख्रिश्चन प्रॉपर्टी संरक्षण बोर्ड स्थापन करावे, 60 पेक्षा अधिक वय असलेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंना पेन्शन लागू करावी, शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळांवर ख्रिश्चन समाजातील व्यक्तींची नियुक्ती करावी व समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी पिवळे रेशनकार्ड मिळावे आदी विविध मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून ख्रिश्चन समाजबांधवांना सरकारी सोयी-सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने हे उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर आली.