आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपाताचे इंजेक्शन विकणारे अजूनही मोकाटच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गोळे कॉलनीतील औषध दुकानातून गर्भपाताचे इंजेक्शन विकणार्‍यांना पाठीशी घालणार्‍या अन्न औषध प्रशासनातील अधिकार्‍यांच्या चौकशीची मागणी समाजवादी पार्टीतर्फे करण्यात आली आहे. शहराध्यक्ष मसूद जिलानी शेख यांनी विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे निवेदन दिले आहे.

गोळे कॉलनीतील एका मेडिकलची तपासणी अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्तांसह अन्य अधिकार्‍यांनी 18 जून 2012 रोजी केली होती. त्यात येथून मिसकॅरेज इंजेक्शन विकल्याचे आढळून आले होते. परवानगी नसताना इतर डॉक्टरांना त्याची विक्री केल्याचेही तपासणीत उघड झाले. त्यानंतर 13 सप्टेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कारणे दाखवण्यासाठी अधिकार्‍यांना दोन महिने का लागले, असा प्रश्न शेख यांनी केला आहे.

यासंदर्भात माहिती मागितली असता, मिळालेले उत्तर आणि विचारलेल्या माहितीत विसंगती असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंतच परवाना निलंबित केल्याचा आदेश देऊन गैरप्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

अन्न औषध प्रशासनाने सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करता दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कारण काय? अशाच प्रकरणात यापूर्वी शहरात दोन जणांचे परवाने कायमचे निलंबित केले. मग या दुकानासाठी वेगळा न्याय का, असा प्रश्नही करण्यात आला आहे.

मोठी विसंगती
माहिती अधिकारात अपील केल्यानंतर तपासणी तारीख, नोटीसची तारीख, आदेशाची तारीख व परवाना निलंबनाची तारीख यात विसंगती आहे. देवाणघेवाणीतून प्रकरण मिटविण्यात आल्याचा आरोप शेख यांनी केला.