आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार्‍यासाठी पशुधनाचा हंबरडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर: जून महिना उजाडून पावसाचे वेध लागले तसे ठिकठिकाणी असलेले चार्‍याचे साठेही संपुष्टात येऊ लागले आहेत. ज्याची टंचाई त्याचाच तुटवडा या न्यायाने दारात असलेल्या जनावरांना चारा द्यायचा कसा हा प्रश्न भेडसावत आहे.
शासनामार्फत चारा वाटपाची योजना रेंगाळल्याने जनावरांचे प्राण कंठाशी आल्यावर शनिवारी बारागावपिंप्री येथे चारा वाटपास आरंभ झाला. या दिवशी येथे चार हजार 570 किलो, तर रविवारी दुपारी 3 पर्यंत 3440 किलो चारावाटप करण्यात आले. अन्य गावांमध्ये ही चारा वाटपाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान, दोडी वावी व धुळवड या गावांमध्ये सुरू करण्यात आलेल्या जनावरांच्या छावण्यांमध्ये चारा उपलब्ध करताना छावणीचालकांना कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस आणि पावसाची प्रतीक्षा वाढत चालली तसा चार्‍याचा प्रश्न अधिक सतावण्याची भीती व्यक्त होत आहे.
कर्मचार्‍यांची उडते त्रेधातिरपीट
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने चालवल्या जाणार्‍या दोडी येथील छावणीतील जनावरांची संख्या तीन हजार 877 वर पोहोचली आहे, तर वावी येथील छावणीत जनावरे दाखल करण्यास शेतकर्‍यांनी सुरुवातीला नापसंती दर्शवली. मात्र, चार्‍याचा प्रश्न गंभीर झाल्याने जनावरे दाखल केली. सध्या या छावणीत 400 जनावरे दाखल झाली आहेत. धुळवड येथे र्शी माउली कृषी साधन संस्थेच्या वतीने चालवल्या जाणार्‍या छावणीत आठवडाभराच्या आत जनावरांच्या संख्येने एक हजार पाचशेचा आकडा पार केला असून, जनावरांच्या वाढत्या संख्येस सोयीसुविधा पुरवताना संचालक व कर्मचार्‍यांची त्रेधातिरपीट उडू लागली आहे.
1972 मध्ये तीव्र स्वरूपाचा दुष्काळ असताना त्यावेळी अन्नधान्याची सर्वाधिक टंचाई होती. जनावरांचा चारा आणि पाण्याची स्थिती या वर्षापेक्षा चांगली होती. त्यामुळे पहिल्यांदाच चार्‍याच्या भीषण टंचाईशी सामना करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आल्याने पशुपालक हबकून गेले आहेत.