आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंहस्थामध्ये रामकुंड रेल्वेस्थानकात लाइव्ह, पोलिस, रेल्वे सुरक्षा दल रेल्वेचा समन्वय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी परतणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांना खरी कसरत करावी लागणार आहे. यामध्ये बहुतांश भाविक हे रेल्वेने प्रवासाला प्राधान्य देत असल्याने स्थानकावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, शहर पोलिस आणि रेल्वे खास रामकुंड येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असून, त्याचे चित्रण थेट रेल्वेस्थानकातील कंट्रोल रूममध्ये दिसणार आहे. तसेच, रेल्वेस्थानकावरील गर्दीचे चित्रण हे पोलिस आयुक्तालयात दिसणार आहे. असा प्रयोग प्रथमच राबविण्यात येत असल्याचे रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी केवळ पन्नास दिवस उरले असल्याने जिल्हा प्रशासनासह रेल्वे, रेल्वे पोलिस, शहर पोलिस, एस. टी. महामंडळ, बांधकाम विभाग, विद्युत विभाग हे कामे पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस एक करीत आहेत. मात्र, सिंहस्थकाळात परगावहून येणाऱ्या भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात वेगवेगळ्या मार्गांनी प्रवेश दिले जाणार आहेत. परंतु, पर्वणीच्या दिवशी आणि मुहूर्ताच्या दिवशी रामकुंड येथे स्नानासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. पर्वणीनंतर पुन्हा परतीच्या प्रवासासाठी भाविक रेल्वेला पसंती देत असल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी तसेच या काळात काही अनुचित घटना घडू नये, यासाठी खास १२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यापैकी दोन विशेष कॅमेरे रामकुंड येथे बसविण्यात येणार असून, त्या कॅमेऱ्यांद्वारे होणारे चित्रण थेट नाशिकरोड रेल्वेस्थानकावर दिसणार आहे.
तसेच, रेल्वेस्थानकावरील चित्रण हे शहरातील पोलिस आयुक्त कार्यालयातील कंट्रोल रूममध्ये दिसणार आहे. या चित्रणाच्या माध्यमातून गर्दीचे नियोजन करण्यात येणार असून, तसेच रस्ते ब्लॉक करण्यात येणार आहेत. त्यासाठी भारतीय दूरसंचार निगमचे साहाय्य घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे शहर पोलिस आणि रेल्वे पोलिस यांच्या समन्वयासाठी स्पेशल वॉकीटॉकी सुविधा ठेवण्यात येणार आहे.
सिंहस्थकाळातील उपाययोजना
- रामकुंड परिसरात दोन विशेष सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे होणार गर्दीचे नियंत्रण, स्पेशल कंटोल रूम राहणार सज्ज
- सिंहस्थकाळात मालधक्का येथून धावणार प्रवासी रेल्वेगाड्या
- नाशिकरोड रेल्वेस्थानक, ओढा या रेल्वेस्थानकांवर मिळणार थांबा
- सिंहस्थकाळात भाविकांना रेल्वेस्थानकाऐवजी मालधक्क्यावर जावे लागणार
बातम्या आणखी आहेत...