सिडको - इंदिरानगरातील विविध ठिकाणी तसेच मुख्य चौकात १३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. राजे छत्रपती चौक मित्रमंडळ व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला असून, लोकवर्गणीचा उपयोग सामाजिक कामासाठी करण्यात आला आहे.
या संस्थांनी विविध सण-उत्सवांच्या खर्चाला फाटा देऊन लोकांकडून जमविलेली वर्गणी वापरली आहे. संस्थेचे पदाधिकारी हृषिकेश वर्मा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. उपक्रमाची सुरुवात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे उपाध्यक्ष जोसेफ मलबारी, स्वामी सर्वेश्वर, अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटनाने करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपायुक्त विजय पाटील, भाजपचे पदाधिकारी जगन पाटील, गोपाळ पाटील, सुनील खोडे उपस्थित होते.
असे आहेत सीसीटीव्ही कॅमेरे
कलानगर चौकात २, जॉगिंग ट्रॅकवर ५, साईनाथ चौफुली ४, रथचक्र चौक येथे २ अशा प्रकारे सीसीिटव्ही कॅमेरे बसवले जाणार असून, संपूर्ण यंत्रणा वायरलेस आहे. त्यामुळे वीज नसतानाही संबंधित यंत्रणा सक्षमपणे काम करणार आहे. याची माहिती ५० पदाधिकारी व पोलिस अधिकारी यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे पूर्णत: सुरक्षितता जोपासली जाणार आहे.
यापूर्वीचे आठ कॅमेरे युनिक ग्रुपच्या माध्यमातून
नगरसेवक सतीश सोनवणे यांनी राजीवनगर, लेखानगर येथे आठ सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. आता राजे छत्रपती चौक मित्रमंडळ व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीनेदेखील १३ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरात एकूण २१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण भाग आता सीसीटीव्हीच्या टप्प्यात आला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.