आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील सायकल व त्याच्या दुरुस्ती दुकानांची अधिकृत नोंदणी करण्याची आणि महत्त्वाच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी मंगळवारी उद्योजक, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांच्या समन्वय बैठकीत करण्यात आली.
पुणे बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर बाबुभाई राठी सभागृहात झालेल्या बैठकीत पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी नागरिकांनी शेजारच्या घरांवर बारकाईन लक्ष ठेवले तरी बरेच गुन्हे रोखण्यात यश येईल, असे सांगितले.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसबळ तोकडे पडत असल्याने नागरिकांवर मोठीच जबाबदारी येऊन पडते. सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश शिंदे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनराज दायमा, बाजीराव भोसले, शशिकांत महाजन, सुभाष डौले, सुरेश सपकाळे आदी उपस्थित होते.
मॉल्स, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणे येथे कॅमेरे गरजेचे आहेत. तसेच, संवेदनशील ठिकाणीही ते बसवून महापालिकेने त्यांच्या देखभालीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे नगरसेविका देवयानी फरांदे यांनी सांगितले. शहरात राबविले जात असलेले कोम्बिंग कौतुकास्पद असून सायकलच्या दुकानांबाबतही माहिती घेणे गरजेचे असल्याकडे नगरसेवक अजय बोरस्ते यांनी लक्ष वेधले.
दहशतवादी कारवाया, संशयास्पद वस्तूंच्या संदर्भाने शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असून सुरक्षारक्षकांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. बंद असलेल्या पोलिस चौक्या सुरू करणे गरजेचे असल्याचे महापालिकेतील मनसे गटनेत्या सुजाता डेरे यांनी सांगितले. मालेगाव, पुणे येथे झालेल्या बॉम्बस्फोटांत सायकलचा वापर करण्यात आला असल्याने शहरातील सायकल विक्रीची दुकाने, रिपेअरिंग दुकाने यांची नोंदणी ठेवणे गरजेचे आहे, असे मत नगरसेविका सीमा हिरे यांनी व्यक्त केले. नगरसेवक दामोदर मानकर, कविता कर्डक, माधुरी जाधव, भारती बागुल यांनीही मत मांडले.