आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नयनरम्य अातषबाजी, राेषणाईत घराेघरी उत्साहात लक्ष्मीपूजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दीपोत्सवातील मंगलमय वातावरणात घरोघरी, तसेच प्रत्येक व्यापारी अाणि व्यावसायिक पेढीवर अपूर्व उत्साहात मुहूूर्त साधत गुरुवारी (दि. १९) लक्ष्मीपूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी प्रकाशाच्या उत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला. रंगीबेरंगी आणि आकर्षक फटाक्यांमुळे आसमंत भरून गेला होता. सायंकाळपासून अाकाशबाण अाणि रंगीबेरंगी नयनरम्य आतषबाजीने रात्री उशिरापर्यंत सारा आसमंत उजळून निघाला होता. 
 
लक्ष्मीपूजनासाठी लागणारी झेंडूची फुले, फळे, विड्याची पाने, लक्ष्मीची मूर्ती फोटो आदी वस्तूंची खरेदी करण्यासाठी सकाळी दुपारी शहरातील प्रमुख बाजारपेठांत गर्दी झाली होती. सकाळी, दुपारी अाणि सायंकाळी शुभ, लाभ मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. यश, कीर्ती आणि धनलाभाची आराधना करत महालक्ष्मीची पूजा करण्यात आली. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी दिव्यांची आरास करण्यात अाली हाेती. 
 
झेंडूच्या फुलांची तोरणे, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि सायंकाळच्या अमृतवेळी मांगल्य आणि भक्तिभावाच्या सुगंधी वातावरणात घराघरांत, कार्यालयांत तसेच उद्योग-व्यवसायाच्या ठिकाणी वैभव, सुख-समृद्धी आणि भरभराटीचे दान देणाऱ्या श्री लक्ष्मीचे स्वागत करण्यात आले. मनाेभावे पूजन करण्यात अाले. 
 
बंधूप्रेमाचे प्रतीक भाऊबीज सण उद्या 
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज साजरी केली जाते. द्वितीयेचा चंद्र आकर्षक वर्धमानता दाखवणारा असल्याने वाढत्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन हाेवाे, ही त्यामागची भूमिका आहे. या दिवशी सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर प्रथम चंद्रकोरीस नंतर भावाला ओवाळण्याची परंपरा अाहे. लाडका भाऊराया मग बहिणीला ओवाळणी किंवा भेटवस्तू देऊन स्नेहभाव प्रकट करताे. 
 
दिवाळी पाडव्याचा आज उत्साह 
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवाळी पाडवा शुक्रवारी (दि. २०) आहे. बलिप्रतिपदा म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी ‘इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो’ असे म्हणण्याची परंपरा अाहे. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने व्यापारी बांधव दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. 
 
अास्थापनांमध्ये लक्ष्मीपूजन 
शहरातील व्यापारी पेढ्यांवर जमा-खर्चाच्या, रोजकीर्द, खतावणीच्या नवीन वह्यांची पूजा करण्यात आली. विविध अास्थापनांमध्येही सायंकाळी लक्ष्मीपूजन झाले. सोशल नेटवर्किंग साइट्स, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा सिलसिला दिवसभर चालला. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी शहरातील देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. 
 
बातम्या आणखी आहेत...