आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यवर्ती कारागृहाकडून कैद्यांच्या अंगझडतीसाठी बॉडी स्कॅनरचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - मध्यवर्तीकारागृहात कच्चे पक्के कैदी गुप्त ठिकाणी संशयास्पद वस्तू लपवून आणत असल्याचे प्रकार घडत आहेत. अंगझडतीत या वस्तू सापडत नसल्याने अशा संशयास्पद लपविलेल्या वस्तू शोधून काढण्यासाठी कैद्यांच्या झडतीसाठी कारागृहाला बॉडी स्कॅनर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य शासनाला सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कारागृहात दाखल कच्च्या कैद्यांना सुनावणीसाठी न्यायालयात घेऊन जावे लागते. न्यायालयातून परत आणताना कैद्यांना भेटणाऱ्यांकडून मिळणाऱ्या संशयास्पद वस्तू कैदी गुप्त जागी किंवा वस्तू लपवण्यासाठी निरोधचा वापर करतात. झडतीत या वस्तू मिळून येत नाही.
सिमकार्डसारख्या छोट्या वस्तू गिळून घेतात आणि कारागृहात परतल्यानंतर शाैचालयास जाऊन विष्टेतून त्या परत मिळवतात. गुप्त जागी पोटात काय आहे, हे शोधण्यासाठी बॉडी स्कॅनर एकमेव साधन असल्याने ते उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य शासनाला दिला आहे. कैद्यांच्या झडतीत सलग दोन दिवस मोबाइल, सिमकार्ड, चार्जर, बॅटऱ्या आदी संशयास्पद वस्तूंमुळे कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विविध मार्गांचा वापर
कारागृहप्रशासनाने कैदी त्यांच्या बॅरेकच्या झडतीची मोहीम हाती घेतली आहे. झडतीदरम्यान कैद्यांनी वेगवेगळ्या मार्गाने लपवून आणलेल्या वस्तू मिळून येत आहेत. बोटाच्या आकाराचे मोबाइल आणण्यासाठी निरोधचा वापर केल्याची झडतीदरम्यान कैद्यांनी कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
गांभीर्याने विचार करण्याची मागणी
कारागृहप्रशासनाने बॉडी स्कॅनरसह कारागृहाच्या चौफेर गस्तीसाठी वाहन, मंजूर मनुष्यबळ, शासन दरबारी प्रलंबित सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या प्रस्तावावर तातडीने अंमलबजावणीची मागणी केली आहे. कैदी संशयास्पद वस्तू पोटात गिळून घेत असल्याने त्या झडती घेताना मिळून येत नाहीत. कैद्याच्या पोटात काय आहे, हे शोधण्यासाठी स्कॅनरचा प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी प्रशासनाने केली आहे.