आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Railway Manging Director Zero Expectation : After Three Week Not Singal Bogi

मध्य रेल्वे महाप्रबंधकांची पोकळ आश्वासन : पंचवटीला तीन आठवड्यांनंतरही बोगी नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - लेखी-तोंडी मागणीला केराची टोपली दाखवणार्‍या मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुबोध जैन यांना पंचवटी एक्स्प्रेसचे महत्त्व पटल्याने पासधारकांसाठी अतिरिक्त बोगी वाढवण्याची घोषणा सध्या तरी पोकळ आश्वासन ठरले आहे. तीन आठवड्यांनंतरही प्रवाशांना बोगीची प्रतीक्षा आहे.


दररोज सकाळी जागा मिळविण्याच्या धावपळीत अपघात घडत आहेत. नाशिकसाठी मोठय़ा कष्टाने 40 वर्षांपूर्वी सुरू झालेली पंचवटी जिल्ह्यातील नोकरदार, व्यावसायिकांसाठी गरजेची झाली आहे. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे दररोज जा-ये करणारे सकाळी जागेसाठी कसरत करतात. या धडपडीत पाय घसरून, हात सुटल्याने अपघात घडून कधी जीव तर कधी अवयव गमवावे लागत आहेत.


संयुक्त बैठक
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड, ओढा स्थानकाचे विस्तारीकरण, सुशोभीकरण, उपाययोजनेसाठी राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे नियोजन करण्यात राज्य, रेल्वे प्रशासन अपयशी ठरले.


दुतर्फा प्रवासी
पंचवटीचा स्थानकात प्रवेश होताच प्लॅटफॉर्म तीनच्या दुतर्फा उभे असलेले प्रवासी जागा मिळविण्यासाठी गाडीला लटकतात. स्वत:ला डब्यात झोकून देऊन जागा धरतात. हे रोजचेच असते. मात्र, सोमवारची परिस्थिती भयानक असते. प्लॅटफॉर्मवर व खाली रांगेत शेकडो प्रवासी उभे असतात. गर्दीमुळे पंचवटीला पासधारकांची बोगी वाढवण्याच्या जुन्या मागणीला प्रशासनाकडून आजपर्यंत प्रतिसाद मिळाला नाही. आमदार बबनराव घोलप यांनी नाशिक दौर्‍यावरील महाप्रबंधकांकडे केलेल्या अतिरिक्त बोगीची मागणी मान्य करून तीन आठवड्यांनंतरही पूर्ण नाही.


सुखकर प्रवासाची अपेक्षा
दिवसातील सात तासांच्या प्रवासामुळे पंचवटी प्रवाशांचे घर झाले असून, कुटुंबातील सदस्य सकाळपासून वाट बघतात. त्यामुळे प्रशासनाकडून केवळ सुखकर प्रवास व्हावा, ही अपेक्षा असल्याने बोगीच्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी व्हावी. राजेश फोकणे, पदाधिकारी, पंचवटी प्रवासी संघटना


18 नंतर बैठक
उन्हाळी अधिवेशन असल्याने मुख्य सचिव व्यस्त असल्याने अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर 18 एप्रिलनंतर बैठक होईल. बोगीची मागणी मंजूर असल्याने लवकरच जोडणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. बबनराव घोलप, आमदार, अध्यक्ष, प्रवासी संघटना


बोगी मिळाल्यास वाद टळतील
बोगीच्या कमतरतेमुळे दररोज गाडीत जागेवरून प्रवाशांचे आपापसांत वाद, कधी मारामार्‍या होतात. अतिरिक्त बोगीमुळे तंटामुक्त प्रवास होईल. शरद चौधरी, प्रवासी, लहवित