आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोशी-भुजबळांच्या एकत्रित उपस्थितीची उत्कंठा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- कितना भी चाहो, ना भूल पाओगे, हमसे कितना दूर जाओ, नजदीक पाओगे.! हिंदी चित्रगीतातील या ओळींची वेगळ्या अर्थाने प्रचिती शिवसेना नेते मनोहर जोशी व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ या एकेकाळच्या राजकीय मित्रांच्या व्यासपीठावरील एकत्रित उपस्थितीने येणार आहे. हा योगायोग जुळवून आणला आहे देवळाली व्यापारी सहकारी बँकेने!

बँकेच्या मुख्य कार्यालय इमारतीच्या नूतनीकरणाचा शुभारंभ व्हॅलेण्टाइनदिनी, 14 फेब्रुवारीला राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही भेट दोघांच्या मैत्रीसाठी शुभ ठरते का, याचे साक्षीदार राहणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार.

भविष्यातील राजकारणात सर्वोच्च पदासाठी मनोहर जोशींचा अडसर ठरण्याच्या भीतीने भुजबळांनी सेना सोडल्याचे बोलले जाते. त्यानंतर आता राष्ट्रवादीत भुजबळांच्या मार्गात पवार येत असल्याची चर्चा झडतच असते. त्यामुळे या तिघांमध्ये निर्माण झालेल्या या अनोख्या नात्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्यान कसे वाक्युद्ध रंगते, याची राजकीय निरीक्षकांना उत्सुकता आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या स्थापनेपासून मनोहर जोशी व छगन भुजबळ यांनी राज्यात संघटना बळकटीसाठी जीवाचे रान केले. मात्र, सत्ताकांक्षेतून त्यांच्यामध्ये पुढे दरी निर्माण होऊन दोघांचे मार्ग वेगळे होऊ शकतील, असे कुणालाही वाटले नाही. पण तसे घडले. राज्यात सेनेची सत्ता आली तरी मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार नाही असे वाटल्याने व मंडल शिफारशींना विरोध पाहून भुजबळांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर ते राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दाखल झाले. त्याला एक तपाहून अधिक काळ लोटला. या कालावधीत एकमेकांविरोधात त्यांनी टीका केली नाही. त्यामुळेच राजकीय विचारधारा वेगळी असूनही दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आपुलकी कायम असल्याचा निष्कर्ष जाणकार काढत आहेत.