आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेची मते शिवसेनेकडे गेल्याने आमचा पराभव, अपयशाची भुजबळांकडून समीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला (जि. नाशिक) - ‘नाशिकमध्ये खूप कामे केली, त्याचा विचार लोकांनीही केला. त्यामुळेच गत निवडणुकीत समीर भुजबळांना सव्वादोन लाख मते मिळाली, तर या वेळी मला सव्वातीन लाख मते मिळाली. मात्र या निवडणुकीत मनसेची मते शिवसेनेकडे वळाली. शिवाय नरेंद्र मोदींची लाट आणि मराठा समाजाची नाराजी हे दोन प्रवाह माझ्या विरोधात होते. त्यामुळे मी सामना करू शकलो नाही’, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिकमधील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार छगन भुजबळ यांनी रविवारी प्रथमच आपल्या पराभवाची समीक्षा केली.
पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, दिल्लीतील दोन बड्या नेत्यांनी दोन मते व्यक्त केली. सोनिया गांधी म्हणाल्या की, लोक आमच्यावर नाराज आहेत हे लक्षात आले नाही, तर भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनी ‘नरेंद्रभाईनी कृपा केली’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यांवरूनच सर्व अंदाज येतो. कॉँंग्रेसवर जनता नाराज होती, या लाटेचा मोदी यांनी फायदा करून घेतला. कॉँग्रेसचे नेतेच तसे बोलत असल्याचा खुलासाही भुजबळांनी केला.
मराठा समाजाची नाराजी
‘मोदींची लाट देशभर होती तीच नाशिकमध्ये असल्याची आम्हाला कल्पना होती. पण प्रचंड विकासकामे केल्याने मतदार माझा विचार करतील, अशी आम्हाला खात्री होती. लोकांनी आमचा विचार केलाही. पण शिवसेनेला मनसेची मदत मिळाली. शिवाय मी मराठा समाजाच्या विरोधात आहे, असा खोटा प्रचार जाणीवपूर्वक करण्यात आला. त्यामुळे मोदी लाट व मराठा समाजाची नाराजी हे दोन प्रवाह माझ्यासमोर होते. पण भविष्यात लोकांना या खोट्या प्रचाराची जाणीव होईल’, असेही भुजबळ म्हणाले.
विधानसभेसाठी लाट नसेल
‘विधानसभेत काय?’ या प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, लोकसभेतील विजय मोदी यांचा आहे. भाजपने प्रचारासाठी सोशल व इलेक्ट्रॉनिक मीडियाचा योग्य वापर केला. पण त्याला प्रखरपणे उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो. मात्र विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा नसेल. राज्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादीने चांगले काम केले असून अजून खूप कामे करायची आहेत. त्यामुळे पुन्हा आमचीच सत्ता येणार, अशी खात्री आहे. अनेकदा मतदारांनी लोकसभेला व विधानसभेला वेगळा कौल दिलेला आहे. कुठलाही पराभव हा शेवटचा नसतो, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोदी लाट चालणार नसल्याचा पुनरुच्चार भुजबळांनी केला.