आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ नकोयत का? छगन भुजबळ यांचा बैठकीत भावनिक सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर पक्षीय बैठकीत भावनिक झालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ‘आमचे नेतृत्व नको असेल तर सांगा, संपूर्ण भुजबळ कुटुंबीयच निवडणूक लढवणार नाही,’ असा भावनिक सवाल सोमवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केला. कोणावरही नेतृत्व लादले जाणार नाही, असे सांगतानाच त्यांनी पक्षातील नाराजांची आक्रमक शब्दात कानउघाडणीही केली. ‘ज्यांच्या मागे चार लोक नाहीत त्यांनी मोठय़ा पदांची अपेक्षा करू नये,’ असे सांगतानाच भुजबळांचा पाय ओढताना शरद पवारसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या पदरातही अपयश टाकल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पराभव झाला. या पराभवाचे चिंतन करण्यासाठी सोमवारी भुजबळांनी दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी भुजबळ म्हणाले की, देशात नरेंद्र मोदी लाट असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मी स्वत: पवार साहेबांना राजकीय जीवनातील ही अत्यंत कठीण निवडणूक असेल, असा अंदाज वर्तविला होता. सुप्त नाराजीही दिसत होती. त्याला नाशिकमध्ये मराठा कार्डचाही तडका दिला गेला. त्यामुळे लाटेवर स्वार होऊन कोणीही निवडून आले असते. कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. कॉँग्रेसच्याही काही नेत्यांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
नाराजांचा समाचार घेताना भुजबळ म्हणाले की, ‘माझी कोणाविषयी तक्रार नाही. मात्र ज्यांच्या पाठीमागे चार लोक नाहीत त्यांनी मोठय़ा पदाची अपेक्षा करावीच कशी? मुळात तुम्ही शक्तिहीन असाल तर पक्षाला ताकद मिळेलच कशी? त्यामुळे तुमच्या मतदारसंघात व विभागात आधी प्रभाव निर्माण करा म्हणजे पक्ष शक्तिवान होईल,’ असा टोला त्यांनी लगावला.
‘जे काम करीत नसतील त्यांचा आढावा घेऊन त्यांना दूर करावे लागेल. आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो,’ असा चिमटाही भुजबळांनी काही नेत्यांना काढला.

पुतण्याचे आभार
‘समीर भुजबळ यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतरही त्यांनी झोकून देऊन काम केले. राजकारणात काका- पुतण्यामधील कुरबुरी सर्वर्शुत आहेत. आई- बापालाही दूर करणारे असतात. त्यामुळे समीर यांचे मी मनापासून आभार मानतो,’ असे भुजबळ यांनी भावनिकपणे सांगितले.