आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2008 मधील पूर मानवीय चूकच, पालकमंत्र्यांची कबुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गंगापूरचे धरण 95 टक्के भरेपर्यंत पाणी सोडायचे नाही, अशा नियमावर अडून बसल्यामुळेच एकदम पाणी सोडण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली. या मानवीय चुकीमुळेच 2008 मध्ये नाशिकला पुराचा तडाखा बसल्याची कबुली पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपत्ती निवारण समिती बैठकीत दिली.

पालकमंत्र्यांनीच हे विधान केल्याने आतापर्यंत दबक्या आवाजात झालेल्या पुराबाबतच्या चर्चेला पुष्टीच मिळाली आहे. त्यामुळे यापुढे तरी जलसंपदा विभागाने अधिक सतर्क राहून पाणी सोडण्यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांना पाच ते सहा तास आधीच सूचित करण्याचे आदेशही भुजबळांनी या वेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शनिवारी आपत्ती निवारण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. महानगरात आपत्ती आल्यानंतर तिथे केवळ महापालिकेची यंत्रणाच काम करेल, असे चालणार नसल्याचेही या वेळी त्यांनी निक्षून सांगितले.

नाशिकमध्ये काही नदीनाल्यांचे स्रोत अडविले गेले असल्यास त्याबाबत महापौर आणि पालिकेच्या यंत्रणेने ं ती खबरदारी घेऊन कारवाई करावी असेही ते म्हणाले. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा आपत्ती निवारण आराखड्याचे सादरीकरण केले. कोणत्या धरणातून कधी पाणी सोडले जाणार, त्यामुळे किती पूर येणार त्याचा अभ्यास तयार असल्याचेही जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा जयर्शी पवार, महापालिका आयुक्त संजय खंदारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

नियमांवर अडू नका

धरण 95 टक्के भरल्याशिवाय पाणी सोडायचेच नाही, या नियमांवर अडून बसल्यामुळे आपण वाट पहात बसलो. मग अचानक पाणी सोडावे लागल्याने पुराचा तडाखा सहन करावा लागला. त्यामुळे भविष्यात अशा नियमांवर अडून न बसता भविष्यातील पावसाचा अंदाज घेऊन थोडे-थोडे पाणी सोडण्याचे नियोजन करावे. तसेच पाणी सोडण्याआधी जिल्हाधिकार्‍यांना पाच ते सहा तास सूचित करावे, असेही भुजबळ यांनी नमूद केले. तसेच लष्कराशीदेखील चर्चा करण्यात आली असून,अल्पशा मदतीसाठी चीफ सेक्रेटरीपर्यंत बोलण्याची किंवा त्या वेळी धावपळ करण्याची गरज पडू नये, यासाठी स्थानिक स्तरावरच समन्वय राखण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.