आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chagan Bhujbal Speaking At Two Days National Seminar At Nashik

जिल्हानिहाय डाउन्स सिंड्रोम केंद्रांसाठी प्रयत्न- पालकमंत्री भुजबळ यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जगभरातील प्रत्येक 740 बालकांमागे एकाला जन्मजातच डाउन्स सिंड्रोम हा आजार असतो. मात्र, त्याची तीव्रता शासनाच्या, प्रशासनाच्या किंवा सामाजिक संघटनांच्याही लक्षात आलेली नाही. त्यामुळे पोलिओ उच्चाटनासाठी राबविलेल्या एखाद्या मोठय़ा कार्यक्रमाप्रमाणे डाउन्स सिंड्रोमबाबत जनजागृती करणे, प्रत्येक जिल्ह्यात एक केंद्र उभे करण्याचा कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

डाउन्स सिंड्रोम केअर असोसिएशनतर्फे या जनुकीय आजाराबाबत आयोजित डाउन्स सिंड्रोमग्रस्त पालक आणि बालकांसाठीच्या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. ज्ञानदेव चोपडे, रजनीताई लिमये आणि डॉ. जयदीप निकम आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी भुजबळ म्हणाले, की ज्या पालकांना अशी बालके होतात, त्यांना ती कशी वाढवावी, काय काळजी घ्यावी, त्यांचे संगोपन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी केंद्र उभे राहण्याची आवश्यकता आहे. डॉ. चोपडे यांच्या कार्याचीही त्यांनी प्रशंसा केली.

आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी या बालकांसाठी काम करणे ही ईश्वरसेवा असल्याचे सांगितले. शासनाने या बालकांसाठी काही ठोस कार्य करावे, याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे नमूद केले. रजनीताई लिमये यांनी अशा बालकांना शिक्षण, प्रशिक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसन अत्यावश्यक असल्याचे सांगितले. आयोजक डॉ. ज्ञानदेव चोपडे यांनी संशोधन आणि समुपदेशन सुविधेसाठी किमान एक एकर जागा शासनाकडून मिळण्याची आवश्यकता असून, या प्रकरणी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी विनंती केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सुहास र्मचंट यांनी पाहुण्यांचा परिचय करून त्यांचे स्वागत केले. वैशाली बालाजीवाले यांनी सूत्रसंचालन केले.

नाशिकमधील केंद्रासाठी लवकरच जागा
नाशिकमध्ये डाउन्स सिंड्रोम केंद्र उभारणीसाठी जागा मिळवून देण्यासाठी महापालिकाच नव्हे, तर शासनदरबारीदेखील प्रयत्न करून, लवकरात लवकर जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्यावर केंद्राची वास्तू उभारणीसाठी जी काही मदत लागेल, ती करण्यास तयार असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या वेळी जाहीर केले.