आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनसाखळीचोर अवघ्या पंधरा मिनिटांत चतुर्भुज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पायी जाणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करून पळून जाणाऱ्या संशयितास वाहतूक शाखेच्या पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून अवघ्या पंधरा मिनिटांत पकडले. संशयितांकडून सोन्याचे पेंडेट, तुटलेली सोनसाखळी हस्तगत करण्यात आली. सोमवारी (दि. १७) दुपारी १२.३० वाजता मुरलीधरनगर, पाथर्डी फाटा येथे वाहतूक विभागाच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायी जाणाऱ्या अरुणा कापसे (रा. साईकृपा बंगला, अश्विनीनगर) या घराजवळून दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पायी जात असताना पाठीमागून आलेल्या जीन्स आणि निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणाने ब्लेडच्या सहाय्याने सोनसाखळी कापून पलायन केले. गळ्यातील सोनसाखळी आणि पेंडेट घेऊन तो पायी फरार झाला. पाथर्डी फाट्यावर कारवाई करत असलेले वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक सुरेश भाले, कमलेश आवारे, संजय पगारे यांना एका दुचाकीचालकाने हा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दुचाकीहून जात असताना वरील वर्णनाचा तरुण संशयास्पदरीत्या पळत असताना भाले यांच्या निदर्शनास आले. क्षणाच्या विलंब करता दुचाकीहून त्याचा पाठलाग सुरू केला. पाथर्डी फाट्यावरील मुरलीधरनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये संशयित घुसला. जाळी आणि भिंतीवरून उडी मारून तोे पळून गेला. चपळाई दाखवत भाले यांनी अपार्टमेंटच्या विरुद्ध दिशेला जाऊन नागरिकांच्या मदतीने संशयितास पकडले. अंगझडतीमध्ये तुटलेली सोनसाखळी, पेंडेट मिळून आले. चौकशीमध्ये अरविंद सुदाम लाटे (वय २७, रा. मूळ परभणी, हल्ली रा. इंदिरानगर, टिटवळा, ठाणे) असे त्याने नाव सांगितले. संशयितास अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे, निरीक्षक मधुकर कड यांनी भाले आणि पथकाचे अभिनंदन केले.

घटनेचे गांभीर्य ओळखले
^दुचाकी चालकाने घडलेला प्रकार सांगताच सतर्क झालो. दुचाकीहून जात असताना सदर वर्णनाचा संशयित पळून जात असताना दिसला. क्षणाचा विलंब करता दुचाकीहून पाठलाग सुरू केला. नागरिकांच्या मदतीने त्यास पकडणे शक्य झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ पाठलाग सुरू केल्याने पकडणे शक्य झाले. -सुरेश भाले, सहा.निरीक्षक, वाहतूक शाखा
बातम्या आणखी आहेत...