आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनसाखळी चाेरी; पोलिसांची अशीही तत्परता, वकिलांच्या मातेचे मंगळसूत्र चाेरणारा दिवसांत ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस यंत्रणेला अपयश येत असताना, विशेष व्यक्तींसाठी मात्र पोलिस कशी तत्परता दाखवतात, याचे एक उदाहरण नुकतेच दिसले आहे. विशेष सरकारी वकिलांच्या आईचे मंगळसूत्र चोरणाऱ्यास सहा दिवसांतच शोधून काढण्याची किमया शहर पोलिसांनी दाखवली आहे. या कामगिरीबाबत पोलिस यंत्रणा नक्कीच कौतुकास पात्र आहे, मात्र सोनसाखळी चोरीच्या इतर गुन्ह्यांच्या तपासाबाबात अशीच तत्परता दाखवली असती तर पोलिसांची प्रतिमा अधिक उंचावली असती.
गंगापूररोडवर शहीद चौकात १९ एप्रिलला सकाळी ११ वाजता विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या मातोश्री अलका मिसर यांची सोनसाखळी चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. शहरात दोन दिवस रात्री उशिरापर्यंत नाकेबंदी लावल्याचा मात्र उपयोग झाला नाही. गुन्हे शाखेकडून परिसराचा झपाटल्यागत तपास सुरू असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित कैद झाल्याचे दिसले. त्याचे छायाचित्र सर्व पोलिस ठाण्यांत पाठवले. मात्र, काही उपयोग झाला नाही. अखेर मुंबई येथील सर्व पोलिस ठाण्यांत छायाचित्र पाठविल्यानंतर कल्याणला त्यावर सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.

या अाधारे रात्रीच तब्बल २० पोलिसांचे स्वतंत्र पथक आंबिवली येथे पाठवून मुंबई गुन्हे शाखेच्या मदतीने संशयिताचे घर शोधण्यात आले. सापळा रचून संशयित जाफर अली इराणी (वय २२, रा. आंबिवली) यास अटक करून झडतीत मिसर यांच्या मातोश्रींची सोनसाखळी हस्तगत केली. शहरात दोन ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याची कबुली संशयिताने दिली. मात्र, या दोन गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत केला नाही. संशयिताकडून सोनसाखळी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असली तरी पोलिसांकडून फक्त विशेष लोकांसाठी तत्परता दाखवली जाते, हेच या तपासावरून अधोरेखित झाले.