आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chairman Election : BJP Claimed On Standing Committee

सभापती निवडणूक : स्थायीवर भाजपचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्थायी समिती सभापती आपलाच होणार असल्याचा दावा मनसेकडून केला जात असतानाच दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी ऐन वेळी अपक्ष, रिपाइं आघाडीतील सदस्यांना गळाला लावून खेळी खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, त्याच वेळी महायुतीतील शिवसेना आणि भाजपाच्या सदस्यांनीही सभापतीपदावर जाहीरपणे दावा सांगितल्याने पेच वाढला आहे. यासंदर्भात, शिवसेनेच्या पदाधिकारी, नगरसेवकांची जिल्हाप्रमुखांसोबत गुरुवारी बैठक होणार असून त्याकडे लक्ष लागले आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेपाठोपाठ नाशिक पालिका प्रभाग सभापती निवडणुकीत सेना-मनसे आणि भाजपा एकत्रित आल्याचे चित्र आहे. यामुळे गेल्या वर्षी स्थायी सभापती निवडणुकीसाठी स्थापन झालेली काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना, अपक्ष यांची महाआघाडी फुटून महायुती तयार झाली आहे. याच महायुतीचा सभापती होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच शिवसेनेचे शिवाजी सहाणे, भाजपाकडून माजी महापौर बाळासाहेब सानप व सीमा हिरे यांनी अर्ज घेतला आहे. यात, सहाणे यांची निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यांनी पक्षर्शेष्ठींपासून स्थानिक पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतल्याचे वृत्त आहे. याबाबत शिवसेना कार्यालयात गुरुवारी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पुढील दिशा ठरविली जाणार आहे. तर मनसेसोबत सत्तेत असलेल्या भाजपाकडूनही सीमा हिरे यांनी पक्षर्शेष्ठींशी संपर्क साधून उमेदवारीसाठी आग्रह धरला जात आहे.
महायुतीतील तीनही पक्षांकडून सुरू असलेल्या तयारीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उचलला जाण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींकडे अपक्ष नजर ठेवून आहेत. तेही ऐन वेळी भूमिका जाहीर करतील, असे बोलले जात आहे.

घडामोडींवर नजर ठेवून
महायुतीचा उमेदवार असल्यास निवडणूक अविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, ऐन वेळी महायुतीतील काही सदस्यांना घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने नवीन समीकरण जुळविल्यास आणि आमची त्यांना आवश्यकता भासल्यास निर्णय घेऊ. सद्यस्थितीत घडामोडींवर नजर ठेवून आहोत. गुरुमित बग्गा, नगरसेवक, अपक्ष आघाडी

भाजपाचाच सभापती
पालिकेत सत्ता स्थापन करताना मनसे-भाजपा युतीच्या वेळी स्थायी समितीचे पहिले वर्ष मनसे आणि दुसरे वर्ष भाजपाकडे राहील, असे ठरले आहे. मनसेकडून शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे अेखरच्या क्षणापर्यंत भाजपाची दावेदारी कायम राहील. ऐन वेळी पक्षर्शेष्ठी ठरवतील त्याला उमेदवारी मिळेल. लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष, भाजपा

स्थायी सभापती राहणार मनसेचाच
स्थायी समिती सभापती ही अतिशय महत्त्वाची आणि आर्थिक विषयाची समिती असल्याने मनसेच्या अनुभवी सदस्याचीच वर्णी लागणार आहे. यामध्ये अशोक मुर्तडक आणि रमेश धोंगडे यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होईल. शिवसेना आणि भाजपा सदस्यांनीही अर्ज नेले असले, तरी शिवसेनेच्या आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शुक्रवारी बैठक होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या चर्चा असून मनसेचाच सभापती होईल. वसंत गिते, आमदार तथा सरचिटणीस, मनसे