आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Change Direction Mumbai Krsnakunja To Be In One To One 'discussion

दिशा बदलाची -मुंबईत कृष्णकुंजवर होणार ‘वन-टू-वन’ चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-महापौर विरुद्ध नगरसेवक या वादाची गंभीर दखल घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 21) मुंबईत कृष्णकुंज निवासस्थानी महापौर अँड. यतिन वाघ यांच्यासह पक्षाच्या 39 नगरसेवकांची बैठक बोलवली असून, या वेळी ते प्रत्येक नगरसेवकाशी स्वतंत्र चर्चा करून त्यांच्या मनातील ‘राज’ जाणून घेणार असल्याचे वृत्त आहे. सर्व नगरसेवकांना एकाच बसमधून मुंबईत नेले जाणार आहे.

गेल्या आठवड्यात नाशिक दौर्‍यावर आलेल्या राज यांच्या लक्षात मनसेतील गटबाजी लक्षात आली. खरे तर, दौर्‍यापूर्वीच पक्ष संघटनेचे पदाधिकारी, महापौर व नगरसेवक यांच्यात तिहेरी वाद धुमसला होता. मात्र, त्याकडे ठाकरे यांनी दुर्लक्ष केले. नंतर दौर्‍यादरम्यान त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने भाजपच्या पदाधिकार्‍यांनी ती संधी साधत मनसेला लक्ष्य केले. भाजपच नव्हे, तर अन्य विरोधी पक्षांनीही निमंत्रण नसल्याचे सांगत विकासकामांच्या उद्घाटनांवर बहिष्कार टाकला.

मूलभूत समस्या सोडवण्यासाठी मनसे अयशस्वी ठरत असल्याच्या प्रश्नांना पत्रकार परिषदेतही ठाकरे यांना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर त्यांनी महापौर वाघ यांच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त करीत नगरसेवकांनी स्पष्टपणे भूमिका मांडावी, असे सांगितले. मात्र, राज यांची मन:स्थिती पाहून नगरसेवक त्या वेळी मनातले बोलू शकले नाहीत. त्यामुळे नगरसेवकांच्या अडचणीवजा तक्रारी लक्षात घेऊन महापालिकेत योग्य ते फेरबदल करण्यासाठी मंगळवारी चर्चा होणार आहे. सूत्रांनुसार, ठाकरे प्रत्येक नगरसेवकाशी साधारणपणे 5 मिनिटे ठाकरे महापालिकेतील कारभार व शहराच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करतील. सूचनाही ते जाणून घेतील. मुंबई नाका किंवा ‘रामायण’ येथून बसद्वारे मुंबईस प्रयाण केले जाणार आहे.

आमदार, पदाधिकारी दूर

महापौर व नगरसेवकांबरोबर होणार्‍या या बैठकीपासून पक्षाचे तिन्ही आमदार, तसेच स्थानिक पदाधिकार्‍यांना दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पक्षातील लोकप्रतिनिधींना विकासकामे करताना पदाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपामुळे काही अडचणी तर येत नाही ना, याबाबतही ठाकरे जाणून घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.