आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एनटीएस’ परीक्षेत गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या नॅशनल टॅलेंट सर्च (एनटीएस) परीक्षेत रविवारी गोंधळ उडाला. या परीक्षेचे पेठे शाळेतील केंद्र शासकीय कन्या शाळेत अचानक बदलल्याने आणि सेमी इंग्रजी माध्यमाचा पेपर उपलब्ध नसल्याने 10.30 वाजता सुरू होणारी परीक्षा 10 मिनिटे उशिराने म्हणजे 10.40 वाजता सुरू झाली, तर या 10मिनिटांबाबत पालकांनी आक्षेप घेतल्याने काही विद्यार्थ्यांनीही त्यास सर्मथन देत ऐनवेळी परीक्षेचे केंद्र बदलल्याने नाराजी व्यक्त केली.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एनटीएस परीक्षेचे रुंग्टा, सारडा, पेठे या शाळांमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यातील पेठे हायस्कूलमध्ये 500 विद्यार्थ्यांचीच क्षमता असल्याने आणि तसे पुणे शिक्षण विभागास कळविले असतानाही येथे 142 जादा म्हणजे 642 विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली. याची कल्पना असतानाही त्याबाबत शनिवारपर्यंत कुठलेही नियोजन केले नाही. त्यामुळे रविवारी ऐन परीक्षेच्या काही वेळ आधीच या अतिरिक्त विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षण विभागाने शासकीय कन्या शाळेत सहा वर्गांमध्ये व्यवस्था केली. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांची धावपळ झाली. शिवाय प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचाही मोठा प्रश्न उपस्थित झाला. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांच्याशी काही पालकांनी याबाबत संपर्क साधला असता, तक्रार दिल्यास त्यावर चौकशी केली जाईल, असे सांगत या विषयास फारसे गांभीर्याने घेतले नाही. याबद्दल पालकांनी आश्चर्य व्यक्त केले, कारण परीक्षा होऊन गेल्यानंतर त्यांच्या कारवाईचा उपयोग होणार नसल्याचेही पालकांनी स्पष्ट केले.

सेमी इंग्रजीच्या पेपरमुळेच उशीर : मराठी व इंग्रजी माध्यमाचा पेपर उपलब्ध असतानाही सेमी इंग्रजी माध्यम असलेल्या 13 विद्यार्थ्यांसाठी पेपर नसल्याने काही विद्यार्थ्यांना 10 मिनिटे, तर काहींना 15 मिनिटे पेपर उशिरा मिळाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. जमा करताना मात्र काहींना वेळ वाढवून मिळाल्याचे, तर काही वर्गांत वेळ मिळाला नसल्याची तक्रारही विद्यार्थ्यांनी केली. पाऊण तासाचा बुद्धिमत्तेचा पहिला पेपर 10.40 वाजता देत 11.15 ला 35 मिनिटांतच घेण्यात आला, तर काही वर्गांत तो 11.25 वाजता घेण्यात आल्याचे विद्यार्थी आणि पालकांनीही सांगितले. पालकांनी केंद्रप्रमुखांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

एनएमएमएसएस परीक्षेतही गोंधळ : आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएसएस) परीक्षा रविवारी झाली. यात दोन पेपर घेण्यात आले. मराठा हायस्कूल परीक्षा केंद्रावर पहिल्या पेपरच्या वेळी काही वर्गांत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर पर्यवेक्षकांनी त्या बदलून दिल्या. मात्र, यात 15 मिनिटांचा वेळ वाया गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

काय आहे एनटीएस परीक्षा
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (एनटीएस) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असते. राष्ट्रीय स्तरावर यातून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. ती दोन टप्प्यांत होते. प्रथम टप्प्यात स्थानिक पातळीवर ही परीक्षा होते. त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अर्थात, महाराष्ट्रातील मुलांची मुंबईत दुसरी परीक्षा होते. त्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची दरमहा पाचशे रुपयांची शिष्यवृत्ती लागू होते. पदव्युत्तर पदवीपर्यंत ही शिष्यवृत्ती दिली जाते.