आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार्वाक चौकातील रस्त्याचे काम मार्गी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इंदिरानगरमधील गजानन महाराज मंदिर ते चार्वाक चौक या शहर विकास आराखड्यातील 12 मीटरचा रस्ता तयार करण्याचे काम मार्गी लागले असून, या रस्त्यास अडथळा ठरणारे बांधकाम मंगळवारी पालिकेने काढून घेतले. यामुळे 22 वर्षांपासून भिजत पडलेला प्रश्न निकाली निघून रस्त्यावरील वाहतूक कोंडी रुंदीकरणामुळे कमी होण्यास मदत होणार आहे.

‘दिव्य मराठी’ विकास मंच अभियानाच्या माध्यमातून 9 डिसेंबर रोजी नगरसेविका दीपाली कुलकर्णी आणि नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या प्रभाग 40 मध्ये कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी इंदिरानगर जॉँगिंग ट्रॅकजवळील शनिमंदिरापासून ते चार्वाक चौक या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडला होता. त्यावेळी दोन्ही नगरसेवकांनी 9 मीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो 12 मीटर करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते, तर दुसरीकडे या रस्त्यावर असलेल्या रहिवाशांनी आपल्या बंगल्याच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम हटविण्यास विरोध दर्शविला होता. त्यानंतर महापौरांनी वाढीव एफएसएआय तसेच पालिका स्वखर्चाने संरक्षक भिंत बांधून देईल, असे आश्वासन दिल्याने मंगळवारी या रस्त्यावरील 19 बंगल्यांचे भिंतीचे वाढीव बांधकाम हटविण्यात आले.


‘दिव्य मराठी’चेच हे यश
विकास मंच कार्यक्रमात नागरिकांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे पाठपुरावा होऊन प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. 12 मीटर रस्ता होणार असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. यशवंत निकुळे, नगरसेवक, प्रभाग 40

मध्यस्थी यशस्वी
‘दिव्य मराठी’ आणि महापौर अँड. यतिन वाघ यांनी हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मध्यस्थी केल्याने त्यात यश आले.संबंधित रहिवाशांना अडचण समजावून सांगितल्याने त्यांचेही सहकार्य महत्त्वाचे ठरले. दीपाली कुलकर्णी, नगरसेविका, प्रभाग 40