आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शिवाजी उद्यानासाठी आता विकसकाचा शाेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सीबीएस चौकातील ब्रिटिशकालीन जॅक्सन गार्डन अर्थात अाताच्या छत्रपती शिवाजी उद्यानाचा कायापालट करण्यासाठी महापालिकेवर चक्क खासगी विकसक शाेधण्याची नामुष्की ओढविली असून, त्यासाठी कामे करण्यासाठी उत्सुक विकसक, खासगी संस्था, कंपन्यांना वर्तमानपत्रातून अावाहन करण्यात अाले अाहे. दरम्यान, नाममात्र शुल्क अाकारून उद्यानात प्रवेश अन्य खेळांच्या सुविधा दिल्या जाणार असून, त्यासाठी महापालिका काम देताना संबंधित संस्थांची अार्थिक पत ख्याती तपासणार अाहे.
फुलांचे शहर गुलशनाबाद अशी पुरातन अाेळख असलेल्या नाशिक शहरात साडेचारशेहून अधिक उद्याने अाहेत. मात्र, या उद्यानांचा शिराेमणी किंबहुना नाशिकमध्ये ब्रिटिश राजवटीत पहिले म्हणून शिवाजी उद्यानाची अाेळख अाहे. ज्यावेळी नाशिकचा चाैफेर विकास झाला नव्हता, नगरपालिका अस्तित्वात हाेती, त्यावेळी साधारण १९८० च्या सुमारास या उद्यानात मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर वाघ, सिंह आबालवृद्धांचे आकर्षण होते. मात्र, जसा नाशिकचा विकास सुरू झाला, तशी शिवाजी उद्यानाला उतरती कळा लागली. खासकरून सीबीएस कान्हेरेवाडीच्या भागातील कुंपण तुटून पडले. नवीन खेळणी बसविण्यात अाली असली तरी त्यातील अनेकांना गंज चढला आहे, तर काही तुटलेली आहेत. संगीतावर डोलणारे पाण्याचे कारंजे बंद पडले. येथील अाकर्षणाचे केंद्र ठरलेल्या मत्स्यालयाची दुरवस्था झाली. त्यानंतर जवळपास तीन एकरावरील या उद्यानाच्या विकासासाठी सत्ताधारी मनसेने खासगी विकसकाचा शाेध घेतला. महिंद्रा अॅण्ड महिंद्राने त्यासाठी तयारी दाखवली हाेती. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अानंद महिंद्रा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हाेकार दिल्याचे सांगितले हाेते. मात्र, त्यानंतर महिंद्राकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे तसेच, मनसेकडून पाठपुरावा कमी झाल्यामुळे उद्यानाचे नूतनीकरण रखडले हाेते. अाता महापालिकेने जाहीर नाेटीस काढून खासगी विकसकांना उद्यानाच्या विकासाची जबाबदारी स्वीकारण्याचे अावाहन केले अाहे. यात इच्छुक संस्थांची अार्थिक पत तपासली जाणार अाहे. नफा-ताेट्याचा ताळेबंदही तपासला जाणार असून, त्यानंतरच संबंधितांना कामकाज दिले जाणार अाहे.

तिकीटही अाकारणार
या ठिकाणी खासगी संस्थेने उद्यानाचे नूतनीकरण केल्यानंतर येथील खेळण्यांसाठी किरकाेळ तिकीट अाकारले जाणार अाहे. जेणेकरून त्यातून संबंधित संस्थेला खेळण्यांची देखभाल करता येईल, असेही महापालिकेने नमूद केले अाहे. खासकरून माेठ्या कंपन्यांकडून सीएसअार अॅक्टिव्हिटीमधून उद्यानाची देखभाल अपेक्षित अाहे.

असा आहे इतिहास
स्वातंत्र्यपूर्व काळात हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांची हत्या केली होती. जॅक्सन हे नाशिकचे कलेक्टर असताना त्यांच्याकडे रावबहाद्दूर हर्डीकर यांनी शिवाजी उद्यानाची जागा हस्तांतरित केली होती. जॅक्सनच्या मृत्यूनंतर ही जागा त्यांच्या पत्नीला दिली. मात्र, मायदेशी परत जात असल्यामुळे त्यांनी ही जागा उद्यानासाठी दिली. शहरातील पहिले उद्यान म्हणून जॅक्सन गार्डनची स्थापना करण्याचे ठरले होते.