आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या दारी आली ‘स्वस्ताई’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले जात असताना पोलिस कर्मचार्‍यांना मात्र, अशा परिस्थितीतही दिलासा देण्याचे काम पोलिस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे. ‘सदभावना भांडार’ योजनेद्वारे ही किमया साधली गेली आहे. आयुक्तालयासह पोलिस प्रबोधिनी, ग्रामीण पोलिस दलासह पोलिसांच्या इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त अशा सुमारे 7 हजार कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे.

केंद्र शासनाकडून लष्करातील अधिकारी-जवानांना सीएसडी (सेंटर सप्लाय डेपो) मार्फत स्वस्त दरात किराणा मालासह सर्व प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातात. याच धर्तीवर पोलिस खात्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांनाही पुण्यातील केंद्रीय पोलिस कॅन्टींनमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त नंदकुमार चौघुले, संदीप दिवाण यांच्या पुढाकाराने आणि शासनाकडील पाठपुराव्याने ही सुविधा नाशिक शहर व जिल्ह्यातील पोलिस कर्मचार्‍यांना उपलब्ध झाली आहे. पोलिसांच्या कॅन्टीनला ‘सद्भावना भांडार’ असे नाव देण्यात आले असून मुख्यालयातील 2500 चौरसफूटाच्या पोलिस कल्याणच्या सभागृहात भांडार सुरू करण्यात आले आहे.

या भांडाराचे उदघाटन महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचे संचालक संजय बर्वे, विशेष पोलिस महानिरीक्षक धनंजय कमलाकर, आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास प्रबोधनीचे उपसंचालक हरिष बैजल, उपआयुक्त संदीप दिवाण, पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पडवळ आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपआयुक्त नंदकुमार चौघुले यांनी भांडाराची माहिती देत नियमीत किरणा मालासह सर्वच प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती साहित्य उपलब्ध होणार आहे. एमआरपी किंमतींवर 25 ते 40 टक्क्यांपर्यत सूट देण्यात येणार असल्याचेही सांगितले. यासाठी पोलिस प्रबोधनीकडून 10 लाख, ग्रामीण पोलिस दलाकडून 10लाख आणि आयुक्तालयाकडून 20 लाख अशा 40 लाखांचा निधी उभारण्यात आला आहे.

या कर्मचार्‍यांना लाभ
0 आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचारी- 2700
0ग्रामीण पोलिस दला- 2500
0महाराष्ट्र पोलिस दल- 1000
0लाचलुचपत प्रतिबंधक, दहशतवाद विरोधी पथक, राज्य गुप्त वार्ता कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी - 1000