आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषध विक्रेतेही पाळणार आज बंद; केमिस्ट असोसिएशनचे सभासद होणार सहभागी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये नाशिक जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्ह्यातील 4500 सभासद या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. ठोक आणि किरकोळ औषध विक्रीतून होणारी दैनंदिन नऊ कोटींची उलाढाल यामुळे जिल्ह्यात थंडावणार आहे.

औषधी क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक आणि नवीन औषध धोरणात औषध विक्रेत्यांचा नफा घटविण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

नफा कमी करण्यास केमिस्टचा विरोध
सद्यस्थितीत देशात औषधांची दुकाने जास्त आणि केमिस्टची संख्या कमी अशी स्थिती आहे. प्रत्येक दुकानात नोंदणीकृत केमिस्ट असावा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले असून, त्याच्या पूर्तीसाठी वर्षभराचा अवधी देण्यात यावा. डीपीसीओ अंतर्गत आणलेल्या 348 औषधांच्या किमती सरकार कमी करते आहे, त्याला विरोध नाही. मात्र, या औषधांकरिता वितरकाला मिळणारा नफा कमी करण्यात येणार आहे, याला केमिस्टचा विरोध आहे. शासकीय स्तरावर औषध व्यवसायाच्या संबंधित होणार्‍या निर्णयांत केमिस्टलाही सहभागी करून घ्यावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.

असोसिएशनही घेणार रुग्णांची काळजी
औषध विक्रीची दुकाने बंद असल्याचा फटका रुग्णांना बसू नये, यासाठी असोसिएशनचे कार्यालय असलेल्या गोळे कॉलनीतील केमिस्ट भवन येथील 0253- 2318187, 2573874 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास, रुग्ण ज्या परिसरात आहे तेथील औषध विक्रेत्याला रुग्णाची माहिती देऊन औषध उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

केमिस्टचा मूक मोर्चा : नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशनकडून गोळे कॉलनीतून सकाळी 10.30 वाजता मूक मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार असून, मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले जाणार आहे.