आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेक वापराचा फटका बॅँकांसह पर्यावरणालाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- चेकव्दारे पैसे काढणे किंवा रक्कम खात्यात हस्तांतरित करणे येत्या काही वर्षात कालबाह्य होण्याचे चित्र आहे. रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने दिलेल्या सूचनांनुसार चेकच्या (धनादेश) वापरावर आताच निर्बंध आले असून 2014-15 पर्यंत हा वापर 50 टक्क्यांवर आणला जाण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चेकऐवजी उपलब्ध पर्यायी सुविधांचा वापर करण्यावर ग्राहकांनी भर देण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. चेकमुळे बॅँकांचा होणारा अनावश्यक खर्च आणि पर्यावरणाचा र्‍हास या दोन्ही गोष्टी वाचू शकणार आहे.
पारंपरिक पध्दतीने चेकचा वापर पैसे खात्यातून काढणे, टाकणे, बिल अदा करणे, एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे वर्ग करणे याकरीता केला जातो. एका बॅँकेतून दुसर्‍या बॅँकेत तो क्लिअरिंगसाठी पाठविला जातो, यात बॅँकेला प्रिंटिंग, बाइंडिंग, कुरिअर, मेंटेनन्स यापैकी प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक चेकला किमान 50 ते 75 रुपयांचा खर्च येतो. दुसरीकडे चेकच्या निर्मितीकरिता कागदाचा वापर केला जातो, हा कागद झाडांच्या लगद्यापासून बनविला जात असल्याने मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोडीत भर पडते. पर्यावरणाचा होणारा हा र्‍हास थांबावा याकरिताही चेकचा वापर र्मयादेत करणे लाभदायी ठरणार आहे.
या पर्यायांचा होतोय वापर
सद्यस्थितीत बहुतांशी बॅँका कोअर बॅँकिंग सुविधेने जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळेच एटीएम, इंटरनेट बॅँकिंग, मोबाईल बॅँकिंग, ग्रीन चॅनल काऊंटर्सचे पर्याय ग्राहक अगदी सहज वापरत आहेत. या सुविधा दिवसाच्या चोविस तास आहेतच शिवाय पेपरलेसही आहेत, शिवाय रक्कम बॅंक खात्यात तत्काळ जमा होते.
या गोष्टींना बसणार आळा
रिझर्व्ह बॅँकेने आणलेल्या आरटीजीएस आणि एनएफटी यांसारख्या फंड ट्रान्सफर योजना इलेक्ट्रिक क्लिअरिंग सिस्टिमवर आधारित आहेत. त्यांचाच वापर मोठय़ा प्रमाणावर होणार आहे. चेकचा गैरवापर, होणारे घोटाळे आणि रक्कम मिळण्यास होणारा विलंब यामुळे टळणार आहे. सर्वच शासकीय विभागांची पेन्शन, बिले यांची देणी, बॅँकांचे स्वत:चे व्यवहार, आयकर विभागाकडून दिला जाणारा परतावा याकरीता रिझर्व्ह बॅँकेने इटीएफ व्यवस्था स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.
याची काळजी आवश्यक
एटीएम, मोबाईल आणि इंटरनेट बॅँकिंग यांचा वापर करतांना लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, ही व्यवस्था अत्यंत सुरक्षित असून केवळ तुमचा पासवर्ड आणि पिनक्रमांक गुप्त ठेवायची काळजी ग्राहकाला घ्यावी लागणार आहे.
ग्राहकांकडून प्रतिसाद
आज एका धनादेशावर बॅँकांचे जवळपास 50-75 रूपये खर्च होतात. स्टेट बॅँकेकडे शहरातील सर्व बॅँकांचे क्लिअरींग हाऊस आहे ज्यात, दिवसाला सरासरी 10 हजारच्या आसपास धनादेश येतात. 100 कोटींवर क्लिअरिंग रोज होतेय. वास्तविक जलद फंड ट्रान्सफरच्या धनादेशाला पर्यायी व्यवस्था उपलब्ध असल्याने त्याचा वापर सक्षमपणे ग्राहकांनी करायला हवा. बाबुलाल बंब, क्षेत्रीय महाव्यवस्थापक, नाशिक