आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशातून मिळणारे समाधान महत्त्वाचे- चेतन भगत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- यशाची उत्तुंग शिखरे गाठू पाहणा-या नाशिककर तरुणाईसोबत तरुण पिढीचे आयकॉन ख्यातनाम लेखक चेतन भगत यांनी शनिवारी थेट संवाद साधला. ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ‘हाऊ टू बी अ सुपर अचीव्हर’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कालिदास सभागृह तरुणाईने खचाखच भरले होते. भगत यांनी तरुणांना दिलेल्या यशाच्या नेमक्या ‘ट्रिक्स’नंतर सभागृह उत्स्फूर्त जल्लोष अन् टाळ्यांनी दणाणून गेले होते.
यश म्हणजे काय, या तरुणाईला पडणा-या प्रश्नाचे उत्तर चेतन भगत यांच्याच शब्दांत... ‘यशाच्या वाटेवर प्रत्येकाच्या भोवतालची परिस्थिती निराळी असते. प्रत्येक जण आयआयटीयन्स बनू शकत नाही. म्हणून प्रयत्न करणे सोडायचे का? आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करणे आणि त्यातून समाधान मिळवणे म्हणजे यश!’
आपण यश भौतिक सुखाच्या उपलब्धीला मानतो. यामुळे माणसाच्या आयुष्यात आव्हानांचे तसे भासमान टप्पे तयार होऊन यशासारखा शब्दही मर्यादांच्या चौकटीत अडकवला जातो. परिणामी चांगल्या कामाचा खरा आनंद आणि त्यापासून मिळणाºया खºया समाधानालाच आपण मुकतो. तेथेच हातून यश निसटते.
यशाच्या वाटेवर मेहनत तर प्रत्येक जण करतोच. पण ही मेहनत आपण कोणत्या दिशेने करतो यावरही बरेच काही अवलंबून असते. आपल्या प्रयत्नांना तरुणाईच्या टप्प्यावर योग्य दिशा देणे अत्यंत गरजेचे असते. इतरांशी केवळ तुलना करून यशाचे मोजमाप ठरत नाही. कारण प्रत्येकाचा संघर्ष निराळा असतो. प्रत्येकाच्या संघर्षाला तितकीच किंमत आहे हे आपण का विसरतो? छोट्या टप्प्यातील ध्येयासाठी प्रेरणा उपयोगी ठरतेच. पण दीर्घकालीन ध्येयासाठी प्रेरणेसोबतच योग्य नियोजनही महत्त्वाचे आहे. प्रयत्न कुठवर करावेत, तर आपल्या सर्व क्षमतांच्या पलीकडे जाऊन स्वत:ला सिद्ध करण्यासाठी समर्पण गरजेचे असते. असे प्रयत्न जगण्याला दिशा देतात.
एका वळणावर जीवन तुम्हाला थापड मारतेच, म्हणून काही तुम्ही गप्प बसणार की माघारी वळणार? जीवनातील अशा आव्हानात्मक प्रसंगांना तोंड देण्यासाठी तुमच्यात ताकदीने आव्हानांना तोंड देण्याची क्षमता हवी. या टप्प्यावर तुम्ही ‘क्विट’ केले तर तुम्हीच संपून जातात. म्हणून धैर्यही आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असते. स्वत:ला सिद्ध करताना तुमच्यात कमालीचा सकारात्मक दृष्टिकोन हवा.
पालकांवर विश्वास ठेवा- आई-वडील, मित्रपरिवार आणि प्रार्थना या गोष्टींवर कायम विश्वास ठेवा. आपसातील नात्यांमध्ये असणारा विश्वासाचा धागाच माणसाला आव्हानात्मक टप्प्यांवर जगवतो, बळ देतो. विश्वासाचे वेगळे स्थान जीवनात ठेवा, असे आवाहन भगत यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘दिव्य मराठी’तर्फे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर, निवासी संपादक जयप्रकाश पवार, नाशिक युनिट हेड मदन परदेशी यांनी चेतन भगत यांचे स्वागत केले.