आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यापुढे बंडखोरी खपवून घेणार नाही; छगन भुजबळ झाले आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पक्षशिस्त विसरून बंडखोरी आणि वरिष्ठांची यंत्रणा डावलून घरातील मतभेद परस्पर प्रसारमाध्यमांकडे नेण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी देत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीतील नाराजांचा चांगलाच समाचार घेतला. नूतन शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांना बळ देत नवीन कार्यकारिणी तयार करण्याचा आदेश देताना जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ साधण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी भवनातील कार्यक्रमात टिळे यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले. या वेळी भुजबळ यांनी टिळे यांची निवड कशी झाली, हे स्पष्ट केले. ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे शहराध्यक्षपदी नियुक्ती गरजेची होते. त्यासाठी टिळे यांच्यासह नाना महाले, छबू नागरे, देवांग जानी अशी अनेक नावे होती. मी स्वत: प्रत्येकाशी चर्चा केली; मात्र एकमत होत नव्हते. महाले यांनी नकार देत त्यांचा कौल सांगितला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व अन्य नेत्यांशी चर्चा केल्यावर टिळे यांचे नाव निश्चित झाले. टिळे यांनी यापूर्वी अन्य पक्षात दोनदा ही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांना कामाचा अनुभव असल्यामुळेच त्यांचा विचार झाल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. पद न मिळाल्याने नाराज होणे स्वाभाविक आहे. मात्र, भविष्यात अन्य मोठी संधीही उपलब्ध असल्यामुळे नाराजी सोडून सक्रिय होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. माध्यमांकडे जाणार्‍यांवर तत्काळ कारवाईचे आदेशही त्यांनी दिले.
टिळे यांना कार्यकारिणी विस्ताराचे आदेश
‘माझ्याशिवाय पक्ष चालणार नाही. बाकी सर्व नाकर्ते, ही मानसिकता काढून टाका,’ असे सांगतानाच टिळे यांना कार्यकारिणी विस्ताराचे आदेश भुजबळ यांनी दिले. ‘तुम्हाला कॅप्टन केल्यामुळे जय-पराजयाची जबाबदारी तुमच्यावर असेल. त्यामुळे कोण यष्टीरक्षक, कोण गोलंदाज हवा याची निवड तुम्हीच करा,’ असेही अधिकार टिळे यांना भुजबळांनी दिले. कार्यकारिणीत जुन्यांना स्थान द्या; मात्र त्यांच्या कामाचे मूल्यमापन करा, असेही त्यांनी सुचवले.

मनसे, भाजप व शिवसेना भ्रष्टाचारासाठी एकत्र
मनसे, भाजप व शिवसेनेने एकत्र येऊन पालिकेची वाट लावली आहे. त्यांच्या कारभारावर नजर ठेवून चुका जनतेसमोर आणा. त्यासाठी आक्रमक होऊन राष्ट्रवादीने आंदोलने केली पाहिजेत, अशी सूचनाही त्यांनी केली. पराभव झाला म्हणून शस्त्र खाली ठेवणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.