आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

..तरच तरेल चित्रपटसृष्टी; चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी छगन भुजबळांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणेच चित्रसृष्टीला तारू शकते, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

कालिदास कलामंदिर येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे भारतीय चित्रपट शताब्दीनिमित्त आयोजित चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. मनोरंजन क्षेत्रात दरवर्षी 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होत आहे. वर्षास नऊ हजार कोटींची उलाढाल असलेल्या या चित्रपट उद्योगांतर्फे तब्बल 1200 चित्रपट बनवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

शासनाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे प्रेक्षक वळत असल्याचे भुजबळ म्हणाले. दादासाहेब फाळके यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचाही भुजबळ यांनी या वेळी वेध घेतला. एक पडदा थिएटरच्या कर माफीचाही या वेळी त्यांनी उल्लेख केला.

व्यासपीठावर किशोर कदम, स्मिता तांबे, दीपक करंजीकर, मुक्ता बर्वे, नंदू माधव आदी कलाकार, गजेंद्र अहिरे, राजीव पाटील आदी दिग्दर्शक तसेच सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, ए. टी. पवार, विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, अपर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते. चित्रपट महामंडळाचे स्थानिक समन्वयक श्याम लोंढे यांनी ‘भारतीय चित्रपटसृष्टीत नाशिकचे योगदान’ विषयावर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जयंत ठोंबरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी केले. कीर्ती कलामंदिराच्या विद्यार्थिनींनी या वेळी नृत्यातून गणेशवंदना सादर केली. रसिकांनी याला उत्स्फूर्त दाद दिली. दिवसभर चाललेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व चर्चासत्रांना नाशिककर रसिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी करत मराठी चित्रपटसृष्टीविषयीचे प्रेम व्यक्त केले.

अधिकार्‍यांमुळेच रखडतात बहुतांश कामे
इगतपुरी येथे चित्रनगरी उभारण्यासाठीचा प्रस्ताव गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीशी तुलना केल्याने परत आला होता. मंत्र्यांची कामे मोठय़ा प्रमाणावर शासकीय अधिकार्‍यांकडेच अडकून पडतात त्यातील हे एक उदाहरण असल्याचे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात अधिकार्‍यांचे कान धरले. गोरेगावच्या फिल्मसिटीच्या धर्तीवर नाशिकमधील दादासाहेब फाळके स्मारक येथे चित्रनगरी उभारू अशी घोषणा गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली होती. यावर भुजबळ यांनी प्रस्तावाविषयी पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त केली. असे झाल्यास इगतपुरीचा विकास होण्यास मदत होईल असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला. अनेक चांगले प्रकल्प केवळ कागदावरच रखडतात, इगतपुरीचेही असेच झाल्याचे ते म्हणाले.

‘मराठी’ साठी 15 लाख
दरवर्षी तीन ते चार मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे सांगत प्रत्येक चित्रपटामागे 15 लाख गुंतवणार असल्याची घोषणा गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली. नवोदित कलाकार-दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी 1 लाख आणि 50,000 अशी पारितोषिके असलेली लघुपटनिर्मिर्ती स्पर्धा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वयंघोषित सेन्सॉरशिप घातक
स्वयंघोषित सेन्सॉरशिप दाखल केल्याने चित्रपटाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास धक्का पोहोचतो असे सांगत हे चित्रपटास घातक असल्याचे मत अभिनेते व दिग्दर्शक नंदू माधव यांनी व्यक्त केले. आज कलाकारांनी चित्रपटाविषयी ठाम भूमिका घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगताना माधव यांनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती असलेल्या ‘सत्यवान सावित्री’ चित्रपटातील प्रसंग सांगितला.

सांस्कृतिक मंत्र्यांना ताप
केवळ दोनच दिवसांमध्ये या चित्रपट महोत्सवाचे कसेबसे आयोजन झाले आहे याचे प्रत्यंतर पत्रिकेपासून उपस्थित मान्यवरांच्या बोलण्यातून वारंवार येत होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील असा काही कार्यक्रम असल्याचे दोनच दिवसांपूर्वी आपल्याला कळाले असे सांगत आपल्या मनोगतातून शासकीय अनास्थेवरच बोट ठेवले. उपस्थित मान्यवर कलाकारांनादेखील या महोत्सवाची अत्यंत उशिरा कल्पना दिली गेली असेही बोलले जात होते. महोत्सवाअंतर्गत होणार्‍या कार्यक्रमांची पूर्णपणे कल्पना नव्हती अशी तक्रारही काही प्रेक्षकांनी केली. सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांना टायफॉइड झाल्याने ते अनुपस्थित असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या महोत्सवाचाच मंत्र्यांना ताप झाला आहे की काय अशीही खसखस या वेळी उपस्थितांमध्ये पिकली होती. मंत्र्यांची अनुपस्थिती असली तरी पालकमंत्री छगन भुजबळ व मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कार्यक्रमास उपस्थित होते.

ढोल-ताशांच्या पथकासह लोकनृत्य
कार्यक्रमाच्या उद्घाटनापूर्वी फाळकेरोडपासून दामोदर थिएटरमार्गे शालिमार ते कालिदासपर्यंत छोटेखानी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा आदींच्या वेशभूषेत स्थानिक कलाकार सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या पथकासह लोकनृत्य सादर करीत ही रॅली कालिदास कलामंदिरात पोहोचली. मात्र, रॅलीचे अत्यंत छोटेखानी स्वरूप पाहता स्थानिकांचा व इतरांचा फारसा प्रतिसाद या रॅली मिळाला नसल्याचे दिसून आले. तसेच कालिदास कलामंदिराच्या प्रांगणात जुन्या-नव्या चित्रपटांशी संबंधित फिल्म अर्काइव्हजमधील चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.