आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujbal Demand Election Ticket For Sameer Bhujbal

खासदारकीसाठी समीरला द्या संधी;छगन भुजबळांची शिफारस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - साहेब, ‘समीरने ‘विकासवारी’ तुमच्या समोर ठेवली. आणखीही खूप काम करण्याची इच्छा त्याने भाषणातून सांगितलीच. मध्यंतरी छगन भुजबळ लोकसभा लढवणार, अशा बातम्याही आल्या. गृहकलह निर्माण होण्याआधी तो तुम्हीच सोडवा,’ असे सांगतानाच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार समीर भुजबळ यांनाच संधी देण्याची अप्रत्यक्षपणे शिफारसही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली.

येथील बी. डी. भालेकर मैदानावर मंगळवारी झालेल्या मेळाव्यात भुजबळ यांनी अखेरीस चर्चेत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या मुद्याला हात घातला. ते म्हणाले की, खासदार म्हणून समीरने चांगले काम केलेय व यापुढेही तो करेनच. राष्ट्रवादीचे सुविधासंपन्न कार्यालय तयार करण्यासाठीही त्यांनीच पाठपुरावा केला. सध्या उमेदवारीवरून चर्चा सुरू असली तरी अंतिम निर्णय तुमचाच असेल. छगन भुजबळ, समीर, पंकज हे तुम्ही जी जबाबदारी द्याल त्या पार पाडतील. संधीचे सोने करण्याची ताकद असलीच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाच वर्षांनी निवडणुकीच्या रूपाने राजकारण्यांना परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे केलेल्या विकासकामांची पावती म्हणून परीक्षेत पास करून देण्याची जबाबदारी जनतेची असल्याचेही त्यांनी आठवणीने सांगितले. कांद्याचे भाव वाढले तरी शरद पवार, कमी झाले तरी शरद पवार. काहीही झाले तरी पवार यांना जबाबदार धरून चालणार कसे, असा सवालही त्यांनी केला.

पवारांकडूनही सकारात्मक संकेत
भुजबळ यांनी भाषणातून उमेदवारीबाबत निर्माण झालेल्या पेचाकडे लक्ष वेधल्यावर शरद पवार यांच्याकडून त्याला काय प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पवार यांनी थेट कोणताही निर्णय न घेता सूचक वक्तव्य करीत नाशिक लोकसभा मतदारसंघात गोविंदराव देशपांडे यांच्यानंतर समीर भुजबळ यांच्याकडूनच उत्तम काम सुरू असल्याची पावती दिली.

‘विकासवारी’चेही प्रकाशन
खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामांवर दृष्टिक्षेप टाकणार्‍या ‘विकासवारी’ या पुस्तिकेचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले.

हायटेक कार्यालयाचे उद्घाटन
राष्ट्रवादीच्या चार मजली हायटेक कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. कार्यालयातील सुविधांची पाहणीही त्यांनी केली.

या वेळी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, पालकमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र आव्हाड, खासदार समीर भुजबळ यांच्याबरोबरच सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सर्वात हायटेक व सुविधासंपन्न कार्यालय असल्याची पावतीही पवार यांनी भाषणातून दिली. जिल्हानिहाय कार्यालये करण्याचाही मानसही त्यांनी व्यक्त केला.

फाइव्ह स्टार कार्यालय का नको?
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाषणातून कार्यालयाबाबत होणारा उल्लेख लक्षात घेऊन छगन भुजबळ यांनी फाइव्ह स्टार कार्यालय का नको, असा सवाल केला. आजघडीला लोकांकडे वेळ नाही. समस्या चटकन सुटल्या पाहिजे. झटपट पत्रव्यवहार, प्रसंगी दिल्लीसारख्या ठिकाणी फॅक्सही गेला पाहिजे. त्याबरोबरच आपला प्रश्न कोणत्या स्तरावर आहे, याची माहितीही हवी असते. त्यासाठी हायटेक सुविधा असल्याच पाहिजे.