आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात तिहेरी आव्हानाला तोंड देण्यासाठी छगन भुजबळ रिंगणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राष्ट्रवादीने लोकसभेसाठी नाशकातून खासदार समीर भुजबळ यांच्याऐवजी ‘बडे मियाँ’ छगन भुजबळ यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे आता ही लढत पक्षासाठी आणि भुजबळांसाठीही चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे.

मोदींची सुप्त लाट, राज ठाकरे यांचा प्रभाव, तसेच आम आदमी पक्षाबद्दल सर्वसामान्यांत असलेले आकर्षण व त्यातच या पक्षाने दिलेला विजय पांढरेंसारखा चेहरा या सगळ्याचा परिपाक म्हणजे छगन भुजबळ यांची उमेदवारी असल्याचे म्हणावे लागेल. राष्ट्रवादीला यंदा प्रत्येक जागा अत्यंत महत्त्वाची असल्याने अतिरथी-महारथींना निवडणुकीत उतरवण्याचे अगोदरपासून ठरले होते. त्यानुसारच, आता भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असणार!

वास्तविक, समीर यांचे कामकाज पाहता गुणवत्तेच्या आधारे त्यांचे तिकीट कापले जाऊ शकत नव्हते. पण, केवळ कामकाज वा गुणवत्तेपेक्षा निवडून येण्याची क्षमता हा घटक तिकीट निश्चितीवेळी अधिक महत्त्वाचा ठरतो. त्याच आधारावर छगन भुजबळांसारखा सर्वार्थाने ‘हेवीवेट’ उमेदवार दिला गेला आहे. पण, तेवढय़ानेच सारे काही भागेल अशी स्थिती खचितच नाही.

भुजबळांच्या जमा खाती बरेच काही असले तरी दुसरीकडे वजाबाकीचा आकडासुद्धा तसा फुगत जाणारा आहे. ‘इलेक्टोरल मेरिट’साठी आपल्याकडे आवश्यक असणार्‍या तीन एम ‘फॅक्टर्स’पैकी मनी आणि मसल यामध्ये त्यांची बाजू इतरांच्या तुलनेत कैक पट उजवी आहे. मात्र, तिसरा एम म्हणजेच मराठा समाज ही भुजबळांची डोकेदुखी ठरू शकते. अर्थात, त्यातही सध्या अनेक सुप्त प्रवाह आहेत. कारण, मुळातच विरोधात किमान दोन मराठा समाजाचे उमेदवार असतील. शिवाय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या दुसर्‍या फळीतील नेत्यांनाही भुजबळ दिल्ली मुक्कामी गेले तर ते हवेच आहेत. विशेषत: माणिकराव कोकाटेंसारख्यांची स्थानिक पातळीवरची ‘सीनिअँरिटी’ त्यामुळे आपसूकच वाढणार आहे. हा हिशेब केला तर त्यांच्यासारख्यांचा संभाव्य अंतर्विरोध सौम्य होऊ शकतो.

भ्रष्टाचाराचे आरोप
अनुभव, वक्तृत्व आणि प्रचंड मोठी यंत्रणा याही भुजबळांच्या जमेच्या बाजू आहेत; परंतु त्याच वेळी आता मध्ये कुठलीही ‘फायर वॉल’ उरलेली नाही. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी भुजबळांना भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून वारंवार घेरले आहे. त्यामुळे या मुद्यावरून टीकेसाठी भुजबळ विरोधकांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरले तर नवल वाटू नये. राज असोत की ‘आप’, या मंडळींना थेट भुजबळांवर आरोपांची राळ उडवून देणे सोपे जाईल.या कथित आरोपांमध्ये तथ्य किती, हा मुद्दा असला तरी त्यामुळे एखाद्याच्या प्रतिमेवर आणि जनमानसावर विपरीत परिणाम होतो, हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यामुळे स्वप्रतिमेला आणखी तडे न जाऊ देण्यावर भुजबळांना कटाक्ष ठेवावा लागेल.